दैनिक स्थैर्य | दि. 15 मार्च 2024 | फलटण | आता लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची अधिकृत उमेदवारी ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे. आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वच जण भाजपाच्या दिंडीत सामील होणार आहेत; त्यामुळे कुणीही कसलीही चिंता करू नये; असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, सातारा परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले की; गेल्या 30 वर्षापासून फलटण शहरासह तालुक्याचा जो विकास रखडला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आलेले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये होते. त्यांना सुद्धा फलटण येथे सर्वसामान्य नागरिकांना सोयी सुविधा देता आल्या नाहीत. त्या सुविधा देण्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले असून आगामी काळामध्ये सुद्धा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नक्कीच निवडून जातील; अशी खात्री सर्वांना आहे.
फलटण येथे सुरू करण्यात आलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे मी माण तालुक्यामध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होतो. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मला सुद्धा गंडवत फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले आहे. परंतु यामध्ये मला कसलाही दुजाभाव वाटत नाही. कारण सर्व जनता ही एकच आहे. घाटावरचा घाटा खालचा अशी भूमिका कधीही आमच्याकडून घेतली जाणार नाही. आम्ही कधीही घाटा खालच्याना म्हणालो नाही की तुम्ही एवढी वर्ष घाटावर कशाला येत आहात; असा टोला सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी लगावला.
फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व यासोबतच साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी आपल्याला यश आले आहे. यामधील अतिरिक्त सत्र न्यायालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे सुरू झाले आहेत. इतर सर्व मंजुरी ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये येत असून ही कामे सुद्धा मार्गी लागलेली आहेत. यामध्ये कोणतीही अडचण राहिलेली नाही; अशी माहिती यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांमध्ये फलटण शहरासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करून आणलेला आहे. यामध्ये फलटण येथे तारांगण, शहरातील विविध भागांमध्ये बागा, फलटण येथे महिलांसाठी जिम्नेशियम व महिलांसाठी योगा सेंटर याची मंजुरी आणलेली आहे. त्यामुळे फलटण शहराचा चेहरा मोहरा बदलल्यामुळे आपल्याला यश आलेले आहे. फलटण शहरातील प्रत्येक चौक हा सुशोभित केला जाणार आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येकाला याबाबत नक्कीच अभिमान असणार आहे; असेही यावेळी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
फलटण येथे मंजूर करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला MH 53 असा नंबर मंजूर आहे. परंतु सर्व फलटणकरांच्या इच्छेचा आदर ठेवत MH 55 ची मागणी आपण परिवहन खात्याकडे केलेली आहे. तोपर्यंत MH 11 च्या अंतर्गतच फलटण येथे सर्व कामकाज चालणार आहे; असेही यावेळी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी सातारा परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.