दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२१ । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । सध्या देशात व राज्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण सर्व्हेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल विविध नगरपालिकांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कराड व सातारा नगरपालिकेचा सुद्धा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण योजना सुरु झाल्यापासून फलटण नगरपालिकेने या अभियानात सहभाग नोंदवून लाखो रुपयांचा निधी सुद्धा खर्च केलेला आहे. मात्र इतर शहरांप्रमाणे फलटण या अभियानात अद्यापतरी विशेष ठसा उमटवू शकलेले नाही. मात्र हे जरी असले तरी रोजच्या अस्वच्छतेला कंटाळलेले फलटणकर ‘स्वच्छ सर्वेक्षणात नंबर नको पण फलटण नगरपालिकेने निदान आपले शहर स्वच्छ तरी ठेवावे’, अशी मागणी फलटणकर नागरिक दबक्या आवाजात करीत आहेत.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 हा उपक्रम मागील वर्षी सुरु करण्यात आला. यावर्षी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेलेले होते. फलटण शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानाचा शुभारंभ विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन 2020 साली करण्यात आलेली होती. त्यांनी हा शुभारंभ करताना पालिका पदाधिकारी व अधिकार्यांनी फलटण नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मधील मानांकन मिळण्यासाठी कामकाज करावे, असे आदेश सुद्धा दिलेले होते. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत एकंदर फलटण शहराची अवस्था पाहता पालिकेने ना. श्रीमंत रामराजेंच्या आदेशाकडे कानाडोळा केल्याचेच स्पष्ट होत आहे. फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी कचर्याचे भले मोठाले ढिगारे रोजच पाहायला मिळत असतात. शिवाय या अस्वच्छतेमुळे डासांचे साम्राज्य, डेंग्यु – चिकनगुनिया सारख्या आजारांचा फैलावही नागरिकांना सोसावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारणे अत्यंत आवश्यक असून शहराला मानांकन नाही मिळाले तरी चालेल पण निदान शहर स्वच्छ तरी ठेवा, अशी मागणी फलटणकर करीत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणात संपूर्ण देशामध्ये नंबर एकचे शहर असलेल्या इंदौर शहराचासुद्धा अभ्यास दौरा आयोजित केलेला होता. इंदौर शहर पाहण्यासाठी तत्कालीन अधिकारी व नगरसेवक हे फलटण येथून गेलेले होते. परंतु इंदौरची पाहणी करून आल्यावर कोणत्या उपाययोजना फलटणमध्ये करण्यात आल्या हा मात्र ‘अभ्यासा’चाच विषय नक्की ठरणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली कागदी घोडी नाचवण्यात अधिकारी व्यस्त असतात. परंतु फलटण शहर स्वच्छ होण्यासाठी नक्की कोण आणि किती कामकाज करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आपापल्या भागात आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध होण्यासाठी नगरपालिकेमध्ये नगरसेवकांना नागरिक निवडून देत असतात. परंतु मतांसाठी नागरिकांचे उंबरे झिजवणारे उमेदवार विजयी होवून नगरसेवक झाल्यावर आपली जबाबदारी विसरून जावून ‘इतर उद्योगात’च व्यस्त असताना दिसत असतात. काही नगरसेवक व ठेकेदार तर स्वतःच्या फायद्याच्या कामासाठी वेळप्रसंगी मुख्याधिकार्यांच्या निवासस्थानी तळ ठोकून आपली कामे मार्गी लावून घेतात. शिवाय एरवी पालिका कामकाजातून वेळ मिळत नसणारे मुख्याधिकारीसुद्धा ठराविक नगरसेवक, अधिकारी व ठेकेदारांची अशी कामे मार्गी लावून देतात, हे सुद्धा विशेषच म्हणावे लागेल.
सध्या फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी कचर्याचे ढिगारे पडलेले आहेत. अर्थात उघड्यावर कचरा टाकणारे नागरिकही याला जबाबदार आहेत. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्यांनी व नगरसेवकांनी शहर स्वच्छतेकडे थोडे तरी लक्ष देवून शहरातील कचर्याचे साम्राज्य दूर करावे. याकरिता उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलावा, अशीही मागणी शहरातील सुजाण नागरिक करीत आहेत.