संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारा


 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी शिर्डी येथे लाक्षणिक उपोषण करणाऱ्या संत- महंतांची , कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी पाटील शिर्डी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात शेकडो ठिकाणी मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , राष्ट्रीय प्रवक्त्या खा. हीना गावीत , प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाटील म्हणाले की, कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक महिने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र हळूहळू सर्व व्यवहार सुरु होत आहेत. वारकरी , संत महंत मंडळी क्षमाशील आहेत. आषाढी यात्रेची हजारो वर्षांची परंपरा यावर्षी खंडीत करण्यासही वारकरी संप्रदायाने परवानगी दिली . मात्र सर्व व्यवहार सुरु होत असताना मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे.

शिर्डी येथे श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करुन राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली निर्वाणी आखाड्याचे महंत सुधिरदास महाराज, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, सुदर्शन महाराज महानुभाव, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजयनाना महाराज धोंडगे, आचार्य जिनेंद्र जैन, कैलास महाराज देशमुख, रितेश पटेल, बबनराव मुठे आदिंसह अन्य साधु-संत-वारकरी उपोषणात सहभागी झाले होते .

आचार्य तुषार भोसले म्हणाले की , केंद्र सरकारने मागील महिन्यात लॉकडाऊन शिथील करताना मंदिरे उघडण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास अजून परवानगी दिली नाही. एकीकडे बार सुरु करण्यास परवानगी दिली जाते आहे . मात्र मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली जाते आहे. वारकरी संघटनांचे प्रतिनिधी , संत , महंत मंडळींनी गेल्या महिन्यात राज्यात शेकडो मंदिरांत घंटानाद करून मंदिरे उघडण्याची विनंती केली होती. मात्र मुक्या , बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने आमची विनंती ऐकलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे , हेच यातून दिसते आहे.

मुंबईत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!