
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । कामावर येऊ इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. काही दिवसापूर्वीच कामावर येण्याच्या कारणावरुन दोन एसटी कर्मचारीमध्ये वाद होऊन त्यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यामुळे संपत चिघळला असून लालपरीची चाके थांबल्यामुळे अनेक विद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकाला भेट देऊन कामावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक करू नका, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला.