५० कोटींत विकले गेलेल्यांना पुन्हा सभागृहात पाठवू नका ! – माकप आमदार विनोद निकोले यांचा फुटीर शिंदे गटावर घणाघात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । मुरबाड । शिवसेनेत फूट पाडून उद्धव ठाकरे यांच्यासारखा एक चांगला मुख्यमंत्री घालवला, पण 40 दिवस उलटून गेले तरी यांचा ताळमेळ अजून बसत नाही. ते 50 कोटींत विकले गेल्याच्या बातम्या आल्यात. यांनी राजकारण साफ खालच्या थराला नेलंय. अशा विकाऊंना पुन्हा निवडून देत सभागृहात पाठवू नका, असा घणाघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी केला.

अखिल भारतीय किसान सभेने मुरबाड येथे वनहक्क परिषदेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना मार्क्सवादीचे डहाणूतील आमदार विनोद निकोले यांनी फुटीर शिंदे गट आणि राज्यातील एकनाथ, देवेंद्र अर्थात ‘ईडी’ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत राज्यात 03 मुख्यमंत्री झाले. शिवसेना फुटली हे दुर्दैवी आहे आणि उद्धव ठाकरेंसारखे अत्यंत चांगले मुख्यमंत्री पायउतार झाले हे त्याहूनही दुर्दैवी आहे. शिवसेनेचे फुटीर आमदार 50 कोटींना विकले गेल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वासच उडाला आहे. फुटिरांना मिळालेले 50 कोटी जर ग्रामीण भागातील दवाखान्यांवर खर्च केले तर माता-भगिनींना दीर्घ प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत आणि त्यांचा घरापासून दवाखान्यापर्यंतचा पायवाटेने डोलीचा प्रवास बंद होऊन रस्त्यावर होणारी त्यांची प्रसूतीची फरफट थांबेल, असे खडेबोलही आ. निकोले यांनी सुनावले. ही परिषद ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सभागृह, जिल्हा परिषद विश्रामगृह, जुना डाक बंगला मध्ये नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या परिषदेत आदिवासी, दलित, मराठा, आगरी, कुणबी या सर्व समाजांतून शेतकरी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.

1943 – 44 साली कॉम्रेडस् शामराव आणि गोदावरी परुळेकर यांनी मुरबाड, कल्याण आणि शहापूर तालुक्यात किसान सभेची मुहूर्तमेढ रोवली होती, आणि दि. 07 जानेवारी 1945 रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे स्थापना अधिवेशन येथून जवळच असलेल्या टिटवाळा येथे झाले होते. त्याच्या अनेक दशकांनंतर मुरबाड तालुक्यात किसान सभेची या परिषदेतून पुन्हा सुरुवात झाली. या परिषदेचे अध्यक्ष माकप पॉलिट ब्युरो सदस्य तथा अ. भा. किसान सभा राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे होते व परिषदेचे उद्घाटन माकप आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले. या परिषदेमध्ये पक्ष व जनसंघटनांच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले, त्यामध्ये माकप ठाणे – पालघर जिल्हा कॉ. किरण गहला यांनी वन हक्क कायदा: अंमलबजावणी आणि सद्यस्थिती याविषयावर, अ. भा. किसान सभा राज्य समिती सदस्य कॉ. संजय ठाकूर यांनी जमीन अधिग्रहण प्रक्रिया: इतिहास आणि वर्तमान याविषयावर, माकप रायगड जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे यांनी प्रकल्प, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा : स्वरूप आणि वास्तव याविषयावर, अ. भा. ज. महिला सं, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कॉ. प्राची हातिवलेकर यांनी अन्न सुरक्षा कायदा आणि सरकारची जनता विरोधी भूमिका याविषयावर, माकप राज्य समिती सदस्य कॉ. भरत वळंबा यांनी इको सेन्सिटिव्ह झोन – स्वरूप आणि स्थानिकांचे हक्क या जमिनीसंबंधित सर्व विषयांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेचे स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष कॉ. पी. के. लाली यांनी केले, प्रास्ताविक कॉ. डॉ. कविता वरे यांनी केले, सूत्रसंचालन कॉ. दिलीप कराळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन कॉ. दिनेश जाधव यांनी केले. या परिषदेत जमीन हक्क चळवळीची भूमिका मांडून पुढील काळात ज्या विषयांवर लढा उभारायचा आहे त्या विषयांचे ठराव मांडण्यात आले. परिषदेने सर्व ठराव एकमताने मंजूर केले. या परिषदेमध्ये कॉ. डॉ. कविता वरे यांनी जमीन मालकी हक्क विषयावर संशोधन करून भागीदारी तत्त्व संशोधित केले म्हणून भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) दक्षिण ठाणे शहर तालुका समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिकारी घोषणांच्या निनादात परिषदेची सांगता झाली.


Back to top button
Don`t copy text!