दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । सातारा । गेल्या दोन वर्षांपासून सैन्यदलात भरतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या लाखो तरुणांच्या आकांक्षांवर पाणी सोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केले आहे. सैन्यभरतीसाठी केंद्राने घोषित केलेली अग्निपथ योजना अनुचित असून गोरगरीब, ग्रामीण युवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याशी खेळ असल्याचा दावा बहुजन समाज पार्टीने केला आहे. अग्निपथ योजनेवर त्यामुळे तात्काळ पुनर्विचार करण्याची आग्रही मागणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी केली. योजनेविरोधात न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांनी जाळपोळ, हिंसाचार ऐवजी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केले.
अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) तसेच आसाम रायफल्समधील भरतीसाठी १०% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केला असला तरी दर चार वर्षांनी सैन्यदलातून बाहेर पडणाऱ्या उर्वरिक कुशल मन्युष्यबळाचे समायोजन सरकार कसे करणार? असा सवाल अँड.ताजने यांनी उपस्थित केला आहे. सैन्यात भरती होण्यासाठी लाखो तरुण दरवर्षी मेहनत घेतात, त्यांच्या मेहनती सह स्वप्नांचा योजनेच्या माध्यमातून सरकार चुराडा करीत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.
सैन्य दलासह सरकारी नोकरीतील पेन्शनचा लाभ इत्यादी समाप्त करण्यासाठी सरकार सैन्यात जवानांच्या भरती कमी करून चार वर्षांसाठी मर्यादीत करीत आहे,असा आरोप आंदोलकांचा आहे. देशातील जनता अगोदरच गरीबी, महागाई, बेरोजगारी तसेच सरकारचे चुकीचे धोरण आणि अहंकारी कार्यशैलीमुळे त्रस्त आहे. अशात सैन्यभरती बाबत तरुणांमध्ये उत्पन्न झालेली खदखद आता निराशादायक वातावरण निर्माण करीत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी मा.राष्ट्रीय अध्यक्षा बहन सुश्री.मायावती जी यांनी केल्याचे अँड.ताजने म्हणाले.