
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । सातारा । तुम्ही दृष्यम सिनेमाचा पहिला भाग पाहिलाय का? मग दुसराही पहाच. आणि जर का पहिला भाग पाहिला नसेल तर आवर्जून युट्युब किंवा जिथे मिळेल तिथे तो पाहुन दृष्यम 2 मोठया पडद्यावर पहाच. खूप म्हणजे खूपच मस्तय.
आज पुण्यात सकाळी ९ चा शो पाहिला. पहिला भाग पण पुण्यातच पाहिलेला, खूपच आवडलेला. नंतर कळलं की हा कमल हसन या बाप कलाकाराच्या सिनेमाचा रिमेक आहे. म्हणून मग तोही मूळ तमिळ सिनेमा पहिला.
मला अजय देवगण अजिबात आवडत नाही. पण त्याला दृश्यम 1 व 2 मध्ये माफ केले त्याला, त्याचे सर्वात बेस्ट हे सिनेमे आहेत. यात अजय सोबत श्रिया सरण, तब्बू, अक्षय खन्ना, रजत कपूर यांच्यासोबत योगेश सोमण, सिद्धार्थ बोडके, कमलेश सावंत, मृणाल जाधव आणि नेहा जोशी अशी मराठमोळी कलाकार मंडळी ताकदीने चमकलीत.
काल रात्रीच गुंजणने फोनवर तमिळमधील दृश्यमचा दुसरा भाग पाहिल्याचे सांगितले. स्टोरी सांगू नको गं बाई, असं तिला म्हणून उद्या मी हिंदीतील बघणार आहे म्हटले. तिने दुसरा भाग पण खूपच भारी असल्याचे सांगून माझी इच्छा बळकट केली.
बऱ्याच दिवसांनी एक उत्कृष्ट चलतचित्र अनुभव लाभला. सुरुवातच एवढी भन्नाट आहे की बस्स. त्यामुळे सुरुवात चुकवू नका आणि शेवट असा धक्का देणारा आहे की थिएटर टाळ्या शिट्टयांनी दुमदुमले. पुण्यात मल्टिप्लेक्समध्ये असं सहसा होत नाही. चेहऱ्याला इस्त्री मारून आलेलं पब्लिक असतं इथलं. त्यामुळे मी पण कल्ला केला. त्यामुळे शेवट कुणाला सांगू नका.
डॉयलॉग कडक आहेत. स्टोरी दमदार आहे, सर्वांचाच अभिनय ताकदीचा आहे, सिनेमॅटोग्राफी चकचकीत आहे, सुरुवात दमदार आहे, शेवट थिएटर दुमदुमून सोडणारा आहे.
और क्या चाहीए यारो.
फक्त परत परत तेच सांगतो पहिला भाग पाहिला असेल तरच दुसऱ्याची मज्जा येईल एवढं लक्षात असुद्या.
आयुष्यात सुख, आनंद अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळतं. त्याला फार पैसेही लागत नाहीत. नको त्या राजकारण, धर्मवाद यात वेळ न घालवता अशा आनंदाच्या गोष्टीसाठी थोडा वेळ मात्र काढायला हवा. त्यामुळे वेळ काढून नक्की दृश्यम 2 बघाच. पहिला भाग पाहिला नसेल तर तो आधी पाहून हा पहा. सुख मिळेल सुख.
राहुल तांबोळी, भुईंज