दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । आगामी लोकसभेसाठी भाजपचा राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या बारामतीवर सत्ता काबीज करण्याचा मानस आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 2024 च्या विजयासाठी भाजपकडून मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरू असून, महाराष्ट्रात बारामती येते असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. फडणवीसांच्या या विधानावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, उगाच डिपॉझिट जप्त होईल असे अजित पवार म्हणाले आहेत.
बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, त्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा सल्ला अजित पवार यांनी भाजपला दिला आहे. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो असा खोचक टोलादेखील अजित पवारांनी फडणवीसांना लगावत उगाच बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही सर्वांचं डिपॉझिट जप्त होईल अशी टीका केली आहे.
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सध्याचे सत्तेतील सरकार स्थगिती सरकार असून, हे सरकार केवळ मविआ सरकरच्या काळातील कामांना स्थगिती देण्याचे काम करत आहे. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मविआ सरकारने चांगल्याप्रकारे काम केल्याचीही आठवण अजित पवारांनी यावेळी करून दिली.