
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। सातारा। देशात अनेक भाषा असून, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, पण किमान आपल्या राज्यात तरी आपण मराठी बोलूया. आपणच मराठी बोललो नाहीत तर ही भाषाही संपून जाईल. भाषा ही वापराने वाढते. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा असल्या वादात पडू नका. तुम्ही मराठी बोला, असे आवाहन प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी केले.
सातारा नगरपालिका आणि मसाप शाखा शाहूपुरी यांच्यावतीने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे. याचे तिसरे पुष्प प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनोद कुलकर्णी आणि पत्रकार हरीष पाटणे यांनी घेऊन गुंफले. यामध्ये सुबोध भावे यांनी यशस्वी कारकिर्दीचा पट उलगडताना गप्पांमध्ये गुंतवून ठेवले.
सुबोध भावे म्हणाले, दहावीपर्यंत नाटकाचा कसलाही विचार डोक्यात नव्हता. परंतु, कॉलेजमध्ये प्रथमच एकांकिका स्पर्धेत अभिनय केल्यानंतर मला या कामातून ऊर्जा मिळत असल्याचे जाणवले. दहावी-बारावीच्या काळात मुलांनी आपले करिअर करायचे ठरवले होते. परंतु, मला माझे करिअरविषयक विचार दररोज बदलायचे. एमपीएससीपासून मार्केटिंग मॅनेजमेंटपर्यंत मला सर्वच काही करावेसे वाटे, परंतु अभिनय कुठेच करायचा नव्हता. परंतु, आज मी अभिनय क्षेत्रात असल्याने मी दररोज वेगवेगळ्या भूमिका करत आहे. नाटकांनी मला गोडी लावली.
माझ्याबरोबर काम करणार्या अनेक ज्येष्ठ व समवयस्क सहकार्यांकडून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.माझ्या कारकिर्दीची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भूमिकेपासून केली. पहिला बाजीराव, निवृत्तीनाथ, महात्मा बसवेश्वर, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकाही केल्या. बालगंधर्वची भूमिका करताना खूप वाचन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळाली हा माझ्या मते मला छत्रपती शिवरायांचा मिळालेला आशीर्वाद आहे. छत्रपती संभाजी महाराज मरण यातना सोसूनही तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे त्यांची भूमिका मिळाल्यास मी भूमिका म्हणून न पाहता प्रसाद म्हणून स्वीकारेन.
शास्त्रीय संगीत हा मेंदूचा मसाज
एक काळ असा होता की माझ्या पाच मालिका एकाच वेळी सुरू होत्या. चित्रपट, नाटकेही सुरू होती. अजिबात विश्रांती घेता येत नव्हती. योगायोगाने त्यावेळी मी शास्त्रीय संगीत ऐकत होतो. या काळात असे जाणवले की एकप्रकारची मन:शांती मिळत होती. त्यामुळे शास्त्रीय संगीत हा मेंदूचा मसाज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.