स्थैर्य, फलटण: हिंगणगाव ता. फलटण येथे सुरू असलेल्या पोल्ट्री मुळे शेजारील आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात माश्यांचा फैलाव झाला असून त्या माशा लहान मुलांच्या अंगावर बसत आहेत. जेवण करत असताना खायच्या ताटामध्ये येत आहेत व जनावरांनाही त्रास देत आहेत त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ हे हैराण झाले असून लवकरात लवकर या पोल्ट्रीला पर्याय शोधून पोल्ट्री मधील सर्व पक्षांना बाहेर काढून पुन्हा एकदा तेथील साफसफाई करून तेथे पक्षी ठेवण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. या मागणीवरून तेथील ग्रामस्थ पोल्ट्री शेजारी आंदोलनाला बसले आहेत तेथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप व फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांना स्पष्टपणे सूचना दिल्या कि, पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कायदा हातात घेण्यास भाग पाडू देऊ नये. ते कायदा हातात घेण्याचे आधी हा रणजितसिंह नाईक निंबाळकर कायदा हातात घेईल. त्याचा विपरित परिणाम सर्वत्र होईल. लवकरात लवकर पोल्ट्री प्रशासनाला सांगून तेथील माशांचा बंदोबस्त करावा. मी स्वतः कित्येक वर्ष पोल्ट्रीचा व्यवसाय केलेला आहे. त्यामुळे पोल्ट्रीची निगा कशी राखावी हे मला चांगले माहीत आहे. उत्तम तज्ञांना बोलावून पोल्ट्री मधील बदल लवकरात लवकर करून घ्यावेत. अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेला आहे.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे, भारतीय जनता पार्टीचे युवानेते जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, अमित रणवरे व पोल्ट्री प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले असून या अभियानाची अंमलबजावणी योग्यरित्या सर्वत्र होणे गरजेचे आहे. अशा मध्ये फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे पोल्ट्री मधून निघाणाऱ्या माशांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासल्या सारखे होईल तरी लवकरात लवकर या माशांचा प्रादुर्भाव कमी करून पोल्ट्री प्रशासनाने योग्य ते बदल करावेत. पोल्ट्री मध्ये जे जे कामगार काम करीत आहे, त्या कामगारांच्या कुटुंबीयांनी येथे येऊन एक आठवडा राहून दाखवावे त्याशिवाय त्यांना येथील ग्रामस्थ कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत, याची कल्पना त्यांना येणार नाही. आपल्या कुटुंबीयांसमवेत येथे राहिल्यानंतर नक्की माशांचा किती त्रास आपल्या कुटुंबियांना होतो, हे त्यातील अधिकाऱ्यांना कळेल. यावर लवकरात लवकर योग्य तोडगा काढून येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली नाही तर मी स्वतः या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पुढील कार्यवाहीसाठी उपोषणाला बसेन, किंवा दुसऱ्या मार्गाने कायदा हातात घेऊन पोल्ट्रीला नक्की काय अडचण आहे हे त्यांच्या लक्षात आणुन देईन.
पोल्ट्रीचा व्यवसाय बंद व्हावा किंवा पोल्ट्री येथून बंद व्हावी अशी कोणतीही आपली भूमिका नसून फलटण तालुक्यामध्ये असणारे सर्व व्यवसाय योग्य तरी ते चालले पाहिजेत. परंतु या व्यवसायापासून फलटण तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही व कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. आगामी काळामध्ये हिंगणगाव परिसरातील नागरिकांना पोल्ट्रीचा जास्त त्रास व्हायला लागला तर पोल्ट्री बंद केल्याशिवाय आपण राहणार नाही. पोल्ट्री प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून तेथील सर्व बदल करून घ्यावेत व येथे एका तज्ञाची नियुक्ती करावी. याशिवाय येथील हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणारा नाही व माशांच्या प्रादुर्भावापासून हिंगणगाव पंचक्रोशीतील नागरिकांची सुटका होणार नाही, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.