ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका; आता फलटणमध्ये हि दाखल होऊ लागले आहेत ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे


स्थैर्य, फलटण (प्रसन्न रुद्रभटे) : आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, “मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.” यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच मोबाईलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्‍कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. हा काय प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा प्रकारचे अनेकांना फोन आलेले असू शकतात. हा प्रकार आहे सायबर क्राईममधील एटीएम फ्रॉडचा. फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. त्यावर ऑर्डर देताना स्वत:ची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन टाकतात. आता काही दिवसांपूर्वी फलटण शेजारील असणाऱ्या कोळकी या गावातील एका युवकाची पेटीएम केवायसी करून देतो म्हणून त्याच्या खात्यामधून व क्रेडिट कार्ड मधून सुमारे चौदा लाख रुपयांचा डल्ला ह्या भामट्यांनी मारला. बरेच जणांचे किरकोळ डल्ले हे कायम सुरु असतात परंतु प्रत्येक जण हा पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा नोंद करीत नाही. काहींची रक्कम छोटी असते तर काही जण पोलीस स्टेशनला गेल्यावर आपले नाव खराब होईल म्हणजेच आपण एवढे सुशिक्षित असून आपण फसलो गेलो हे जगाला कळेल म्हणून गुन्हा दाखल करत नाहीत तरी ह्या पुढे ओनलाईन जमान्यात सर्वांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

फोनवरून एकाने आम्ही सैन्यदलात असून, आम्हाला तुमच्याकडील साहित्य खरेदी करायचे असल्याचे सांगून वस्तूच्या खरेदीपोटी आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवीत मोबाईलवरील यूपीआय क्‍यूआर कोड मागविला. ​आणि मग त्यात, फोनवरून एकाने आम्ही सैन्यदलात असून, आम्हाला तुमच्याकडील साहित्य खरेदी करायचे असल्याचे सांगून वस्तूच्या खरेदीपोटी आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवीत मोबाईलवरील यूपीआय क्‍यूआर कोड मागविला. व्यावसायिकांच्या यूपीआय कोडच्या आधारे बॅंक खात्यातून हजारो रुपये काढल्याचे अनेक प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. फलटण सारख्या ग्रामीण भाग असणाऱ्या ठिकाणी पण आता असे फोन येऊ लागले आहेत. आता प्रत्येक व्यावसायिकांनी आपली व आपल्या बँक खात्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सैन्यदलाच्या नावाचा वापर करून फसवणुकीच्या घटना चिंतेत टाकणाऱ्या आहेत. पुणे कॅन्टान्मेंटमधून बोलत असल्याचे सांगत भामट्याने कोड स्कॅन करण्याची गळ घातली. यातून संबंधितांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनमुळे आधीच व्यवसाय व उलाढाल ठप्प होती. गेल्या काही दिवसांपासून अनलॉकमुळे व्यवहार पूर्वपदावर येत असताना भामट्यांकडून व्यावसायिकांना टार्गेट केले जात आहे. अशाच फसवणुकीच्या घटनांना आळा बसविण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बॅंक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले जातात आणि आपण समजतो मी पैसे काढले नाही, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. फिशिंग या सायबर गुन्ह्यांत लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत माहिती बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्डची माहिती मिळविली जाते व या माहितीच्या आधारे लोकांना लुटले जाते.

ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे. ऑनलाइन गंडा घालण्याच्या सायबर गुन्ह्यामध्ये कोणी कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करीत आहेत. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबॅंकिंगच्या माध्यमातून पैसे देखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते. ऑनलाइनद्वारे फोन विकत घेतला; मात्र घरी आल्यावर त्यात साबण निघत असतो. मागितलेल्या वस्तू न देता दुसऱ्याच वस्तू, खराब वस्तू देणे, पैसे परत न करणे याला ऑनलाइन गंडा घालणे असे म्हणतात.

ई-वॉलेट वापरा; पण जपून

हल्ली बहुतांशजणांच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट वापरले जातात, पैशांच्या हस्तांतरणासाठी वापर केला जात आहे; परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो, की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. सर्च इंजिनवर पूर्वी प्रमुख कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; मात्र आता तर गॅस एजन्सी, कुरिअर एजन्सींचेही नंबर इंटरनेटवरील सर्च इंजिनवर असतात. त्यात एडिटींगची सोय असते. आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक घुसवतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचे संपर्क क्रमांक मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना युजर्सचे व्यवहार अयशस्वी झाले तर ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलसारख्या सर्च इंजिनवरून मिळवितात. ते बोलताना असे वाटते, की तो कस्टमर केअरचा प्रतिनिधीच आहे. त्यावर विश्‍वास ठेवून भामट्यांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी युजर्स करीत जातो. त्यात दहा रुपयांचा व्यवहार असो की भामट्याने सांगितलेल्या धोकदायक लिंकवर जाणे असो. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला जाते.

भामटे समोरच्याला फोनवर संभाषण करीत असतानाच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा रुपयांचे किंवा अन्य कितीही रुपयांचे ट्रान्झेक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या सूचना फॉलो करणाऱ्याचा डाटा मिळतो. त्यानंतर ते भामटे ऑनलाइन ट्रान्झेक्‍शन करून मोकळे होतात.

अशी करा खात्री

  1. इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे का, नाही याची खात्री करायला हवी.
  2. गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाइटवरूनच घेतले की नाही याचीही खात्री करावी.
  3. एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळविल्यानंतर तो त्याच व्यक्तीची आहे का, हे तपासावे.
  4. फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे.
  5. भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. विशेषत: दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाइटचीही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा आपणास हव्या असलेल्या वेबसाइट योग्य आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे.
  6. सायबर गुन्हेगार शक्‍यतो सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान आपल्याला फोन करीत असतात. त्यामुळे असे फोन आल्यास स्वतः बॅंकेत जाऊन विचारपूस करणे अधिक योग्य आहे.
  7. त्याचप्रमाणे आपली बॅंकेची, कार्डची माहिती फोनवर किंवा अनोळखी व्यक्तीला देणे टाळणे व होता होईल तेवढे व्यवहार चेक किंवा रोखीने करावेत.
  8. आपण खरेदी करीत असताना आपले कार्ड अनेक ठिकाणी स्वॅप करीत असतो. त्यामुळे आपल्या कार्डची कॉपी व पिनची कॉपी होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यामुळे कार्डद्वारे केले जाणारे व्यवहार जागरूकपणे करणे कधीही फायद्याचे आहे.

सायबर गुन्ह्यांत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे. क्रेडिट नंबर क्रेडिट कार्डधारकाची सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन खरेदी करणे, क्रेडिट कार्डचे नंबर व घटकांविषयी माहिती दुसऱ्या व्यक्तीला, गुन्हेगारांना देणे टाळावे.

सायबर गुन्हेगार हा इंटरनेटवर ऑनलाइन असतो; तसेच फिशिंग या सायबर गुन्ह्यामुळे आपली वैयक्तिक माहिती त्याच्याकडे असते. अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्‍वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत.

आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. गुन्हे करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यातून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणालाही त्यांच्या गुन्ह्याची शिकार बनवू शकतात. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकिंगसाठी संबंधित गुन्ह्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. या कॅशलेशच्या मानसिकतेमुळे त्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!