दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी वरून पंढरपूरला जात असते. संपूर्ण पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून मार्गस्त होत असतो. ह्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम फलटण येथे दि. ०१ जुलै व ०२ जुलै रोजी असणार आहे. तर फलटण तालुक्यात एकूण चार मुक्काम असणार आहेत. तरी कोरोना नंतर ह्या वर्षी पालखी सोहळा होत असल्याने वारकर्यांना कोणत्याही सेवा व सुविधा कमी पडू देवू नका, असे निर्देश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले.
फलटण तालुक्यातील पहिले उभे रिंगण होत असलेले श्री चांदोबाचे लिंब, तरडगाव येथील पालखी तळ, सुरवडी पालखी विसावा, फलटण येथील पालखी तळ व बरड येथील पालखी तळाची पाहणी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपाधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, धन्यकुमार गोडसे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
पालखी तळावर पावसामुळे चिखल होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागेअभावी भाविकांची व वारकऱ्याची कसलीच गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. या वर्षी फलटण येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दोन मुक्काम असल्याने शहरात काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे यावेळी शेखर सिंग यांनी स्पष्ट केले.
पालखी सोहळयातील वारकऱ्याची व भाविकांची फलटण तालुक्यातील मुक्कामात कसलीही गैरसोय होणार नाही. या प्रकारे सोहळयाचे चोख नियोजन करावे. दि. ३० जुन रोजी फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिबं येथे पालखी सोहळयातील पहिले उभे रिगंण होणार असुन यावेळी फलटण ते लोणंद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी यावेळी दिल्या.