दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कमध्येच त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या भाजपला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी चांगलेच फटकारले. या मागणीला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला पाहिजे, त्याची स्मशानभूमी होऊ नये. शेजारी दुसरी चांगली मोठी स्मशानभूमी आहे. परंतु शिवाजी पार्क हे एकमेव मोठं ग्राऊंड आहे. ज्यावर मुलांना खेळता येतं. तिथं शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांच्या मॅचेस होतात. व्यक्तींचं स्मारक करायचे असेल तर इतर अनेक जागा आहेत, परंतु मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानांवर अतिक्रमण करावं असे मला वाटत नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
भाजपचे आमदार राम कदम यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात राम कदम यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. भारतरत्न लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कोट्यवधी चाहते, संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या हितचिंतकांच्या वतीने माझी विनंती आहे की, लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात यावं, ज्या ठिकाणी त्या पंचतत्वात विलीन झाल्या, असं राम कदम यांनी पत्रात नमूद केले होते. या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असेही त्यांनी म्हटले होते.
सध्याच्या घडीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणाऱ्या लता मंगेशकर या दुसऱ्या व्यक्ती आहेत.