दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । फलटण । सध्या जगामध्ये कोरोनाचा ओमिक्रोन हा व्हेरियंट आलेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाबाबत नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. तरी फलटण तालुक्यातील सर्व व्यापार्यांनी कोरोनाबाबत गाफिल राहू नका, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.
फलटण तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली फलटण तालुक्यातील सर्व व्यावसायिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप बोलत होते. यावेळी फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव व शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण तालुक्यातील दुकाने, हॉटेल, कार्यालये यामध्ये कर्मचारी व नागरिक यांना मास्क अनिवार्य करण्यात आलेला आहे. सर्व कर्मचारी व अस्थापनामध्ये प्रवेश करणार्या सर्व नागरिकांना लसीकरणाच्या दोन्ही डोसशिवाय सदरील अस्थापनेमध्ये प्रवेश देण्यात येवू नये. सदरील निर्बंधांचे पालन न केल्यास अस्थापनाधारक व प्रवेश करणारे नागरिक दोघांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे ही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.