
स्थैर्य, सासकल, दि. ०९ सप्टेंबर : सासकल येथील रहिवासी आणि श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, गिरवीचे प्राचार्य संजयकुमार सावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, आपला सुपुत्र कै. स्वप्निल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जपताना सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. सावंत कुटुंबीयांतर्फे भाडळी बुद्रुक येथील ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेस ५ हजार रुपयांची रोख देणगी देण्यात आली.
सावंत कुटुंबीयांनी संस्थेच्या कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, यापुढेही संस्थेला यथाशक्ती मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. सावंत परिवाराने दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी प्राचार्य संजयकुमार सावंत यांच्यासह अक्षय सावंत, विठ्ठल चव्हाण, राजाराम धुमाळ, चंद्रकांत सुतार आणि ह.भ.प. तुकाराम बागल उपस्थित होते.
ज्ञानेश गुरुकुलचे अध्यक्ष, युवा कीर्तनकार ह.भ.प. स्वप्निल शेंडे यांनी उपस्थितांना प्रत्येकी एक वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत केले. संस्थेचे सचिव, युवा भारुडकार ह.भ.प. राहुल महाराज शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.