स्थैर्य, दि. 02 : कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कोठीडत मृत्यू झाल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसबाहेरही निदर्शनं झाली होती. अनेक ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागलं.
अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय. वॉशिंग्टनमध्येही कर्फ्यूची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.
तर हा हिंसाचार मोडून काढण्यासाठी हजारो पोलीस आणि सैन्यही तैनात करण्यात येणार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलंय.
फ्लॉईड यांच्या शवविच्छेदन अहवालावरूनही वाद निर्माण झालाय.
कुटुंबाने करून घेतलेल्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचं म्हटलंय. ‘गळा आणि कमरेवर दबाव आल्याने’ मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
पण सरकारी अहवालात गळा दाबला गेल्याने ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याचा उल्लेख नव्हता. अधिकृत अहवालात या मृत्यूला ‘होमिसाईड’ म्हणजेच हत्या म्हटलं गेलंय.