स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.११ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
नॉवेर्तील संसदेचे सदस्य असलेले ख्रिश्चन टायब्रिग-गजेडे या उजव्या
विचारसरणीच्या-इमिग्रेशन विरोधी राजकारण्यांकडून हे नामनिर्देशन करण्यात
आल्याचे समजते. ट्रम्प यांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ३ अटींची
पूर्तता केली होती, असे गजेडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, ट्रम्प यांना हे
नामांकन देण्यात आले आहे.
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही
देशांसोबत केलेल्या ऐतिहासिक शांतता करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना
शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ट्रम्प यांना ती
निकषांसह हे नामांकन देण्यात आले आहे. त्यामध्ये पहिली अट म्हणजे इतर
राष्ट्रांसोबत सहकार्याची भावना जपत वाटाघाटी करण्यात ट्रम्प यांनी पुढाकार
घेतला. दुसरी अट म्हणजे मध्य पूर्व भागात सैन्यांची घट केली आहे. तर,
तिसरा निकष म्हणजे शांततेचा प्रसार करण्यातही ट्रम्प यांनी पुढाकार घेतला.
ट्रम्प यांनी शांतता प्रक्रियेत चांगली
मध्यस्थी केल्याचे गजेडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही गजेडे
यांनी सन २००६ मध्ये नार्वेच्या संसदेचे सदस्य असताना, इस्रायल समीक्षक
चित्रपट निर्माते अयान हिर्सी अली यांना शांततेच्या नोबेलसाठी नामांकन दिले
होते. मात्र, अली यांना त्यावेळी हा पुरस्कार मिळाला नाही.
दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा
नोबेल पारितोषिकाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच, नोबेल पारितोषिक न
मिळाल्याबद्दल नाराजीही बोलून दाखवली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केलं
होतं. तसेच, नोबेल न मिळाल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचेही ट्रम्प
यांनी म्हटले होते.