स्थैर्य, मुंबई, दि. २८ : कोरोनाची महामारी आहे, पण त्यात असे अनेक मुद्दे आहेत की ज्याकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय. त्यामुळे या महामारीत सरकारने स्वत:चं अपयश झाकण्यासाठी अधिवेशन घेऊन स्वत:चे मुद्दे रेटण्याचा प्रयत्न करू नये, असं माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात.
ते पुढे सांगतात, “राज्यात जी परिस्थिती आहे त्यानुसार सरकारने वयोमर्यादा किंवा इतर काही पर्याय काढले तर आमची काही हरकत नाही. पण जर मुख्यमंत्री फेसबुकवर संवाद साधतात, झूमवर मिटिंग घेतात तर अधिवेशनासाठी व्हर्च्युअल पर्याय का असू शकत नाही? या महामारीत शेतकरी, गरीब मजूर, कामगार, विद्यार्थी अनेक वर्गाचं नुकसान झालंय. बेरोजगारी आलीये. आमच्या भागातले हे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन असतं. ते आम्हाला मांडता आले पाहीजेत. तसे पर्याय सरकारने उपलब्ध करावेत.