स्थैर्य, सातारा, दि. १२ : करोनाचा जिह्यात एवढा कहर सुरू आहे. असे असताना ग्रामीण भागात असलेल्या चारशे उपकेंद्रापैकी दोनशे उपकेंद्रात आता डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार आहेत. नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने दीडशे डॉक्टरांना नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या गावात उपचार घेण्यासाठी तालुक्याच्या किंवा बाजारपेठेतल्या गावात असलेल्या प्राथमिक रुग्णालयात जावे लागायचे. आता ते थांबणार आहे. मात्र, नियुक्त्या दिलेल्यामध्ये काही जण नाराज असून ते सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना भेटणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने अनेकदा ग्रामीण भागात गैरसोयी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. काही डॉक्टर तर लगेच सोडून जात होते. अनेकदा जाहिरात काढूनही डॉक्टर मिळत नव्हते. त्याकरता जिह्यातील 71 प्राथमिक आरोग्य केंद्रात काही सुखसोयी कशा देता येतील हे कटाक्षाने वारंवार प्रशासन पहात आहे. सातारा जिह्यातील आरोग्य विभाग सक्षमपणे कसा कार्यरत राहील. ग्रामीण भागातील नागरिकांना सोयी सुविधा देता येतील यासाठी जिह्यातील उपकेंद्रात डॉक्टर नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हालचाली सुरू होत्या. त्यानुसार तसा विचारविनिमय करून प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यातच मार्चपासुन जिह्यात कोरोनाची साथ आली आहे. सुमारे दीड हजाराकडे रुग्णाचा आकडा गेला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात कोणी ना कोणी आजारी आहे. बहुतेक गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार दिले जात नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रच महत्त्वाची ठरू पहात आहेत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत येणाऱ्या उपकेंद्रात यापूर्वी केवळ आरोग्य सेविका आणि आशा वर्कर कार्यरत होत्या. आता तेथे डॉक्टर सेवा देणार आहेत. जिह्यातील 400 उपकेंद्रापैकी 150 ठिकाणी डॉक्टरांना नियुक्ती दिली गेली आहे. यातील काही डॉक्टर हे नियुक्तीवर नाराज असून त्यांनी आपली व्यथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्याकडे मांडली आहे. आता ते सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना भेटून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. आपल्या जिह्यातील ग्रामीण भागात उपकेंद्रात आता डॉक्टरांची नियुक्ती देण्यात आली आहे. ही पूर्णपणे पारदर्शक अशी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागात ही आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अधिक सक्षमपणे सेवा देणार आहे.