डॉक्टर आत्महत्या प्रकरण: डॉक्टरांवरील ताणतणाव चव्हाट्यावर; आत्मपरीक्षण आणि आत्मबल वाढवण्याची गरज – डॉ. प्रसाद जोशी

फलटणच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना; आरोपींना कठोर शिक्षेची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : फलटणमध्ये नुकत्याच घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेला लाजिरवाणी, धक्कादायक आणि दुर्दैवी संबोधत, शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी वैद्यकीय पेशातील ताणतणाव आणि डॉक्टरांनी आत्मबल वाढवण्याच्या गरजेवर भर दिला आहे. ही घटना फलटणच्या इतिहासाला काळिमा फासणारी असून, यास जबाबदार असणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी सर्व फलटणकर डॉक्टर्स आणि सामाजिक नागरिकांच्या वतीने केली आहे.

डॉ. जोशी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या आत्महत्येमागे कारण काहीही असले तरी, असे मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये. या घटनेमुळे डॉक्टरी पेशातील प्रचंड ताणतणाव आणि कामाचा दबाव पुन्हा एकदा समोर आला आहे. ते म्हणाले, “एखादा डॉक्टर घडायला आयुष्याची १०-१२ वर्षे लागतात आणि प्रॅक्टिस सुरू करेपर्यंत वय तिशी ओलांडलेले असते. डॉक्टर हा नोबल पेशा असला तरी, तो शेवटी माणूस आहे, यंत्र नाही. त्यालाही वैयक्तिक आयुष्य, छंद आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत.”

या आत्महत्येनंतर प्रत्येक डॉक्टरने आत्मपरीक्षण करण्याची आणि आत्मबल वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे डॉ. जोशी म्हणाले. आत्महत्या ही एक पळवाट असून, त्यातून सुटका होत नाही, असे त्यांचे मत आहे. ‘हिप्पोक्रॅटिक ओथ’ घेऊन समाजात सेवा करणे हे डॉक्टरचे कर्तव्य असले तरी, स्वतःची आणि रुग्णाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

आपल्या २५ वर्षांच्या वैद्यकीय अनुभवावरून डॉ. जोशी सांगतात की, “तुमचे काम तुम्हाला मनापासून आवडत असेल, तर त्याचा ताण येत नाही. काम करताना तत्त्वे आणि मूल्ये पाळली पाहिजेत, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि दर्जेदार सेवा देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे.”

डॉ. जोशी यांनी डॉक्टरांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “स्वतःहून चुकीच्या गोष्टी करू नका. आजूबाजूला काही चुकीचे घडत असेल किंवा घडवले जात असेल, तर त्यापासून लांब रहा किंवा वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्या. वरिष्ठ ऐकत नसतील, तर समाजातील प्रतिष्ठित लोकांचा सल्ला घ्या. बाहेरगावी काम करणाऱ्या डॉक्टरांनी (विशेषतः महिला डॉक्टरांनी) स्थानिक पातळीवर एक विश्वासू पालक (लोकल गार्डियन) नेमावा, जो त्यांच्या दैनंदिनीवर लक्ष ठेवेल,” असे ते म्हणाले.

आत्मबल वाढवण्यासाठी आध्यात्मिक उन्नती करणे आणि स्वतःभोवती सकारात्मक वलय तयार करणे महत्त्वाचे आहे. कामाचा दबाव किंवा ताण सहन होत नसेल, तर तो मित्र-मैत्रिणी किंवा लोकल गार्डियनसोबत शेअर करावा, जेणेकरून मन हलके होईल आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येमागील कारण पोलीस आणि प्रशासन शोधून काढेलच, असा विश्वास व्यक्त करत डॉ. जोशी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ही फलटणसाठी अत्यंत दुर्दैवी घटना असून, आरोपींना योग्य शिक्षा व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

शेवटी त्यांनी एका कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या:

डॉक्टरी पेशा असे अजूनही नोबल , करूनका हो त्याला तुम्ही हतबल! पेशंट बरे करण्याचा घेतला आहे त्यांनी वसा , मानसिक ताणामुळे वाटूनये त्याला आता मी जगू कसा! सकारात्मक राहून आपले कर्म करणे हाच असुदे आपला बाणा, सुख- दुःखात अध्यात्म तुम्हाला तारून नेईल हेचि पक्के जाणा !!


Back to top button
Don`t copy text!