स्थैर्य, फलटण, दि. ०७ : सध्या सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये ऑक्सिजन, रेमडीसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. लसीकरण करताना बऱ्याच त्रुटी व लसीचा नियमित पुरवठा नसणे हि सुद्धा मोठी समस्या रुग्णालयांना आता जाणवू लागली आहे. अश्या सर्व गोष्टी असल्याने डॉक्टर वर्गावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. डॉक्टरांवर शिवीगाळ व दमदाटी करण्याचे प्रकार नुकतेच आपल्या येथे घडलेले आहेत. रुग्णांनी संयम ठेवू वागणे गरजेचे आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना सर्व डॉक्टरांनी मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्यरत रहावे, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर छातीचा स्कॅन म्हणजे एच.आर.सि.टी. करण्याचा हट्ट करीत आहेत. तर काही रुग्ण डॉक्टरांच्या मागे लागत आहेत कि, एचआरसीटी सिटी स्कॅन करा. एचआरसीटी सिटी स्कॅनचा रिपोर्ट १५ च्या पुढे आल्यास घाबरूनच रुग्ण दगावले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये एचआरसीटी सिटी स्कॅनचा स्कोर जरी जास्त असेल मात्र रुग्णाची प्रतिकार शक्ती व रिपोर्ट चांगली असेल तर घाबरण्याचे कसलेही कारण नाही. तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीही एचआरसीटी सिटी स्कॅन करू नये, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
एचआरसीटी सिटी स्कॅन केल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो असा दावा ऐम्सच्या डॉक्टरांनी केलेला आहे. एक वेळेस एचआरसीटी सिटी स्कॅन केला म्हणजे तर ४०० वेळा एक्स-रे काढल्यासारखे आहे. त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. त्यामुळे खूप गरज असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच एचआरसीटी सिटी स्कॅन करण्याचा निर्णय घ्यावा, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.