स्थैर्य, ढेबेवाडी, दि. 8 : कोविडचे निदान केल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पाटण तालुक्यातील भरेवाडी (काळगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश आत्माराम खबाले (वय-39) यांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित 7 जणांच्या विरोधात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार, दि. 7 जुलै रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास काळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसून तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश आत्माराम खबाले यांना सात जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी येथील आनंदा शंकर सावंत तसेच अनोळखी चार पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीतील माहितीनुसार डॉ. खबाले दहा महिन्यांपासून काळगाव केंद्रात कार्यरत आहेत. रविवार, दि. 5 जुलै रोजी सावंतवाडीतील नामदेव शंकर सावंत (वय-70) हे छातीत दुखत असल्याने उपचारासाठी केंद्रात आले होते. त्यावेळी डॉ. खबाले जवळच्या वाझोली गावात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तिकडे गेले होते. कर्मचार्यांनी त्यांना कळविल्यानंतर ते केंद्रात परत आले. सावंतवाडी परिसर प्रतिबंध क्षेत्रात आहे. सावंत यांच्यासोबत कोणीही नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाइकांना दवाखान्यात बोलावून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कराडच्या कृष्णा हॉस्पिटलात पाठवले. मात्र दरम्यानच्या काळात शंकर सावंत यांचा मृत्यू झाला.
मंगळवार, दि. 7 जुलै रोजी दुपारी त्यांच्या नातेवाइकांनी काळगावच्या आरोग्य केंद्रात जावून डॉ. खबाले यांना त्याबाबत जाब विचारत मारहाण केली. रुग्णासोबत दिलेल्या कागदपत्रावर कोविडचा उल्लेख केल्याने त्यांना कोणत्याही रुग्णालयात घेतले नाही. तुमच्यामुळेच रुग्ण गेला असे मारहाण करणार्यांचे म्हणणे होते. मारहाण करताना त्यांनी लोखंडी स्टूल फेकल्याने टेबलावरील काच फुटून नुकसान झाले आहे तसेच डॉक्टरांच्या उजव्या हाताला दुखापतही झाली. रुग्णालयातील कर्मचार्यांनी संबंधित मारहाण करणार्यांना दवाखान्याबाहेर काढले. त्यानंतर डॉ. खबाले यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अशोकराव थोरात यांनी भेट देवून तपासाकामी सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेटी देवून पाहणी केली.