
स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑक्टोबर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज फलटण येथे भेट देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सखोल चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी महत्त्वाची माहिती उघड केली. पीडित डॉक्टरने जून महिन्यात पोलिसांविरोधात तक्रार केली होती, मात्र ही तक्रार रुग्णालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे (IC) केलेली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आत्महत्येच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका संशयित आरोपीसोबत फोटो काढण्यावरून वाद झाला होता, जो विकोपाला गेला, अशी माहितीही त्यांनी दिली.
चाकणकर यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी पोलीस, प्रशासकीय विभाग आणि रुग्णालयाची अंतर्गत समिती (IC) यांच्यासोबत तासभर चर्चा केली. या प्रकरणाचा तपास करताना असे समोर आले की, जून २०२५ मध्ये डॉक्टर आणि पोलीस यांच्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांची तक्रार ‘फिट/अनफिट’ रिपोर्ट वेळेत न देण्याबाबत होती, तर डॉक्टरची तक्रार रात्री-अपरात्री संशयितांना तपासणीसाठी आणले जात असल्याबद्दल आणि रिपोर्टसाठी दबाव टाकला जात असल्याबद्दल होती. यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती, जिने २३ ऑगस्ट २०२५ रोजी हा विषय निकाली काढला होता.
या चौकशी समितीने डॉक्टरला पोलीस कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित बोलण्याचा सल्ला दिला होता, किंवा त्यांची पदस्थापना बदलण्याची शिफारस केली होती. प्रशासनाने त्यांना तीन वेळा बदलीचा पर्याय दिला होता, मात्र त्यांनी स्वतः फलटण उपजिल्हा रुग्णालयातच राहण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष आदेश काढून त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती देण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रुग्णालयात अंतर्गत तक्रार समिती (IC) सक्रिय असतानाही, पीडित डॉक्टरने या समितीकडे कधीही कोणतीही तक्रार केली नव्हती, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.
तपासातील कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) च्या हवाल्याने चाकणकर यांनी घटनेच्या रात्रीचा क्रम सांगितला. आत्महत्येच्या दिवशी (लक्ष्मीपूजन) पीडित डॉक्टर दुसऱ्या संशयित आरोपीच्या (जो पोलीस नाही) घरी पूजेसाठी गेल्या होत्या. तिथे फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला, जो विकोपाला गेला. त्यानंतर त्या तेथून निघून एका मंदिराजवळ गेल्या. संशयिताच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणले, मात्र त्यानंतर त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेल्या. रात्रभर त्यांनी त्या संशयिताला आत्महत्येचे इशारे देणारे मेसेज पाठवले, पण त्याचा मोबाईल बंद होता.
मुख्य संशयित आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक याच्याबाबत चाकणकर म्हणाल्या की, सीडीआर तपासणीनुसार जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत पीडित डॉक्टरचे त्याच्याशी संभाषण झाल्याचे दिसते, मात्र त्यानंतर त्यांच्यात कोणतेही संभाषण झालेले नाही. तरीही, हातावरील आरोपांनुसार, त्या चार वेळा अत्याचार केल्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि लोकेशन डिटेक्शनची मदत घेतली जात आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून, तपास सुरू आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात आत्महत्येचाच उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले.
तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले. पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, सायबर विभाग आणि फॉरेन्सिक लॅब असे सर्व विभाग पारदर्शकपणे तपास करत असून, राज्य महिला आयोग स्वतः यावर दररोज लक्ष ठेवून आहे. विरोधकांनी आरोप करणे हे त्यांचे काम आहे, पण अशा निराधार वक्तव्यांमुळे तपासात अडथळा येऊ नये, असे त्या म्हणाल्या. खासदार किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा या प्रकरणात दबाव असल्याची कोणतीही माहिती तपासात समोर आलेली नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

