स्थैर्य, सातारा, दि. 01 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिवशी एक सुंदर बातमी आली….पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना शाहू पुरस्कार जाहीर झाला. मन अभिमानाने फुलून गेले!
खरे तर डॉक्टरांचा दिवस रोजच असतो. कारण आरोग्य, आपल्या जीवनाचा आत्मा आहे. आज कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात याची विशेष जाणीव होत आहे. आरोग्य चांगले राहील, तरच सर्व सुख उपभोगता येतात. शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर आपण जीवनाची लढाई लढत असतो. ही लढाई लढत असताना खरा मार्गदर्शक डॉक्टर असतो ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी अशा सर्वच वैद्यकीय विद्याशाखांमध्ये डॉक्टर जीव ओतून काम करीत असतात. किरकोळ सर्दी, ताप असो मोठा अपघात झालेला असेल त्या क्षणी आपल्याला त्या वेदनेतून दूर ठेवतो तो डॉक्टर असतो. जगभरातील डॉक्टरांना देवाएवढे मोठे स्थान दिले जाते. कारण डॉक्टर मानवजातीसाठी, त्यांच्या उत्कृष्ट आरोग्यासाठी अथक परिश्रम करतात. शिवाय डॉक्टर असणे ही सर्वात जास्त मागणी असलेल्या व्यवसायांपैकी एक मानली जाते. आताच्या काळात तर विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची भूमिका ही प्रत्यक्ष ईश्वरा प्रमाणेच झाली आहे. म्हणूनच हा लेख मी लिहून तुमच्याशी संवाद साधत आहे. वैद्यकीय पेशावर माझी गाढ श्रद्धा आहे. आणि आता तर ती श्रद्धा अजूनच वृद्धिंगत झाली आहे. डॉक्टर म्हणून व्यवसाय करणे निस्वार्थीपणाचे काम आहे. गोरगरिबांची मदत करून त्यांचे आशीर्वाद मिळवणे यासारखे दुसरे पुण्य नाही. डॉक्टरांनी आपल्या सर्वसमावेशक ज्ञानाने प्रत्येक वेळी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. भारतातील वैद्यकीय परिस्थिती जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील डॉक्टर परदेशात जागतिक पातळीवर नवीन उंची गाठत आहेत. आपला भारत देश हा परंपरेचा देश आहे. हे देखील देशातील वैद्यकीय परिस्थिती प्रतिबिंबित करते. आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर चोवीस तास कार्यरत असतात. आपला पूर्ण वेळ आपले पूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी तसेच गोरगरिबांच्या आरोग्यासाठी देऊ करतात. या नोकरीसाठी डॉक्टरांना मनुष्य सेवेच्या निस्वार्थी भूमिकेतून विस्तृत कालावधीसाठी अभ्यास करावा लागतो. सतत अपडेट राहावे लागते. म्हणून अत्यंत कठीण परीक्षा आणि अनेक वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या व्यवसायात इच्छुक लोक प्रवेश करतात या नोकरीसाठी विशिष्ट पातळीवर निश्चय आणि कठोर श्रमाची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा गुण केवळ काहीजणांकडे असतो डॉक्टरांना प्रत्येक समाजात विशिष्ट उंची आणि दर्जा असतो अर्थात वैद्यकीय पेशा हा अत्यंत सचोटीने करावा यात शंकाच नाही. ती एक सेवा आहे म्हणूनच डॉक्टरांना नैतिक दृष्ट्या उच्च दर्जा मिळतो. डॉक्टरांना खूप जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात त्यांच्याकडून खूप अपेक्षाही असतात. कारण इतर व्यवसाय आणि डॉक्टर मध्ये फरक आहे की डॉक्टरचा व्यवसाय किंवा वैद्यकीय व्यवसाय जीवाशी संबंधित आहे. निश्चितच डॉक्टरांना भरपूर ज्ञान असते या व्यवसायात त्यांनी खूप मनाने आणि तनमनधन अर्पण करून ज्ञान मिळवलेले असते. परंतु; त्यांना एक अपेक्षा असते. ती लोकांनी पूर्ण करायला हवी डॉक्टर अनेक गोष्टी समजून सांगत असतात. अनेक प्रकारची काळजी घ्यायला सांगत असतात. ती काळजी लोकांनी घ्यायला हवी. तर डॉक्टरला खूप आनंद होतो. कारण सेवा करत असताना सेवेकरी याला जर दुसऱ्याची साथ मिळाली तर खूप छान वाटते. जसजसा काळ बदलत आहे तसतसे नवनवीन प्रकारचे रोग, विषाणू आपल्यासमोर येत आहेत. नवीन आव्हाने आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार नवीन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवले पाहिजे त्यांच्यापर्यंत चांगले चांगले ज्ञान पोचले पाहिजे. संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आज डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग, डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉक्टर स्मिता कोल्हे, डॉक्टर तात्याराव लहाने अशी अनेक आदर्श उदाहरणे आपल्यासमोर आहेत. काही जण तर वैद्यकीय व्यवसाय आणि समाजसेवा या दोन्हींचा सुंदर मिलाफ घडवतात.त्यांना माझा सलाम..!!
त्यामुळे नवीन नवीन संशोधन करून स्वतःला सिद्ध करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य ठरते. हे आम्हाला मान्य आहे. एखाद्या डॉक्टरची प्रतिष्ठा आणि कौशल्य केवळ त्याच्या नावलौकिकवर अवलंबून नाही. तर त्याची प्रतिष्ठा ही वर्षानुवर्षे केलेला सराव आणि कठोर परिश्रम यातून सिद्ध होते. डॉक्टर बनून आपले आयुष्य कृतकृत्य आणि सार्थ होऊ शकते असे मला मनोमन वाटते. शारीरिक स्थिती वर मानसिक स्थिती अवलंबून असते दोन्ही बाबतीत आपला खरा गुरू हा डॉक्टर असतो अनेक तरुण-तरुणींना डॉक्टर व्हावे असे मनापासून वाटते त्याचे कारणच हे आहे की स्वतः आपण कौटुंबिक सामाजिक पातळीवर आरोग्याच्या समस्या पदोपदी पाहतो त्यावर मात करण्यासाठी उत्कृष्ट डॉक्टरांची जगाला कायम गरज आहे असे डॉक्टर जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. डॉक्टर तात्याराव लहाने यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्राप्त झाला त्याचा मनापासून आनंद वाटला म्हणूनच जीवरक्षक असलेल्या सर्व डॉक्टरांना सलाम करावासा वाटतो.