नाशिक जिल्हा रेड झोन बाहेर कायम राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा : पालकमंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि.३०: जिल्ह्यात कडक निर्बंधामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी, मृत्यूदर अजून घटलेला नाही. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने व जिल्हा रेड झोन बाहेर कायम राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शासकीय विश्रामगृह येथे आयोजित येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाय योजनांचा व‍ विकास कामांचा आढावा  बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर प्रांताधिकारी सोपान कासार (येवला), डॉ.अर्चना पठारे (निफाड) तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, गट विकास अधिकारी उन्मेष देशमुख, संदीप कराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उन्मेश पाटील, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शहरातील कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण करू नये व ज्या रूग्णांचे यापूर्वी गृहविलगीकरण करण्यात आले आहे त्यांचेवर त्वरीत शासकीय रूग्णालयात स्थलांतरीत करून उपचार सुरू करण्यात यावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपायोजना कराव्यात अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणांना  दिल्या आहेत.

कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने बाजारात होणारी गर्दी टाळावी व सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे यासाठी शहरात स्वच्छता ठेवावी व पावसाळापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश श्री. भुजबळ यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना  दिले.

यावेळी तालुक्यांतील पाणी टंचाई बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाणीपुरवठा टँकर्सचा आढावा घेतला. येवला शहर व तालुक्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याविषयी त्यांनी यावेळी संबंधितांना आदेश दिले. तसेच तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप वेळेत करण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी कृषि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

येवला शहरातील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला असून, त्याबाबत  निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!