स्थैर्य, कोळकी, दि. ९ : कोळकी गावामध्ये भाजपाला उमेदवारच मिळत नसल्याने एका घरात दोन तीन जणांना संधी देत आहेत आणि वर म्हणत आहेत कि सत्तांतर करायची आहे सत्तांतर करून काय एकाच घरात सत्ता आणायची का ? असा सवाल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला. दरम्यान कोळकी गावची वाढती लोकसंख्या पाहता गावांमध्ये माणशी पन्नास लिटर पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने जल मिशन योजनेचा लाभ घेणार असून त्याबाबतचा आराखडा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्रीमंत संजीवराजे म्हणाले.
कोळकी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या सभेदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोळकी गाव गेली अनेक वर्षे श्रीमंत रामराजेंच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. पूर्वीची कोळकी आणि आजची कोळकी यात बराच फरक आहे. मतदारांच्या मानाने रहिवाशांची संख्या खूप वाढलेली आहे. आता वाढता तगाव झाला असून त्या दृष्टीने सुविधा पुरवणे गरजेचे आहे. गेल्या पंचवार्षिकला कोळकीसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. मात्र दोन वर्षे वाढत्या रहिवास्यांमुळे योजना अपुरी पडू लागलेली आहे. त्यामुळे आगामी काळात दुसरी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी लागणार आहे. सध्या गिरवी व अन्य पाणीपुरवठा योजना सुरू असल्या तरी पाण्याचा वापर वाढल्याने जल मिशन योजनेतून कोळकीमध्ये प्रति माणसी ५५ लिटर पाणी मिळण्याच्या दृष्टीने सध्याचा योजनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा आराखडा बनवला असून त्यासाठी कितीही खर्च आला तरी तो अमलात आणण्याचे काम सुरू आहे. गावातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी आहे. तो जलजीवन मिशन योजनेची संधी घेऊन आपण सोडणार आहोत. त्याचबरोबर कोळकी गावामध्ये फलटण शहरात सारखीच भूमिगत गटारे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही योजना राबविण्यात येणारी जिल्ह्यात फक्त दोन गावे आहेत. कराड तालुक्यातील बनवडी आणि फलटण तालुक्यातील कोळकी.
या वेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले कि, यापुढील काळात कोळकीच्या विकासासाठी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तसेच आपण स्वतः झुकते माप देणार आहोत. कोळकीच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असे झुकते माप देणे क्रमप्राप्तच आहे.
कोळकीला फलटण शहरात समाविष्ट करावे, अशा बऱ्याचदा मागणी होत असते. परंतु शहरात येण्यापेक्षा कोळकीलाच नगरपंचायतीचा दर्जा देऊन गावचे वेगळे अस्तित्व कायमस्वरूपी बनावे, अशी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचीच इच्छा आहे. फलटण तालुक्यातील जाधववाडी व कोळकी या दोन ग्रामपंचायतीला नगरपंचायत बनवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. कारण जादाचा निधी नगरपंचायतीद्वारे मिळू शकतो. त्यादृष्टीने नगरपंचायत होणे गरजेचे आहे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
सध्या भाजपाकडूनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. परंतु त्यांना उमेदवारीलच मिळत नसल्याने एकाच घरात दोन, दोन, तीन, तीन जणांना संधी देत आहेत, आणि म्हणतात की सत्तांतर करणार. सत्तांतर करून काय एकाच घरात सत्ता आणणार काय ?, असा सवाल यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी केला.
श्रीमंत रामराजे यांच्या सूचनेनुसार जे उमेदवार दिले आहेत त्यामध्ये तरुणांना वाव देण्यात आला आहे. नव्या दमाच्या तरुण मंडळींना वाव देण्याची संधी दिली असली तरी याबाबत विरोधकांकडून समज गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ज्याला राजे गटातर्फे उभे केले आहे, त्यालाच पाठिंबा देणार आहोत. या उमेदवारांना पाठीशी राहावे असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी केले.