
दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । कोरेगाव । कोरोना काळात संपूर्ण जग थांबले असताना, शेतकरी व त्याचे कुटुंब अहोरात्र राबत होते, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे तर शेतकर्यांना दैवतच मानत आहेत, कृषी विभागाने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले असून, आता महिलांसाठी 30 टक्के योजना राखीव ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे घरातील माता-भगिनींच्या नावावर सातबारा उतारा करा आणि एकाच कागदावर अर्ज करुन योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले.
कृषी विभागाच्यावतीने किन्हई, ता. कोरेगाव येथे रविवारी झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्र. बर्गे, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, प्रगतीशील शेतकरी डॉ. गजाननराव चिवटे, अशोक चिवटे, हणमंतराव जगदाळे, विजयराव घोरपडे, प्रा. अनिल बोधे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. भुसे पुढे म्हणाले की, जागतिक पातळीवर शेतीमध्ये होणारे बदल, येणारे नवनवीन तंत्रज्ञान याविषयी आमदार महेश शिंदे यांना प्रचंड ज्ञान आहे. काळाबरोबरच नव्हे तर त्याच्या पुढे दोन पावले चालणारे हे नेतृत्व असून, अनेकवेळा मी स्वत: त्यांचा सल्ला घेतो. माझे ते लहान बंधू असून, माझ्या मालेगाव मतदारसंघावर जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम माझे कोरेगाव मतदारसंघावर असून, नजिकच्या काळात या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. कृषी विभागाच्या सर्व योजना कोरेगाव मतदारसंघात प्राधान्यक्रमाने राबवण्यात येत आहेत. मागेल त्याला आता ठिबक सिंचन दिले जाणार आहे.
कोरेगाव तालुक्यात आले पीक संशोधन केंद्र सुरु करण्याची मागणी आहे, त्याचबरोबर सेंद्रीय शेतीच्या प्रमाणाकिरणाची मागणी होत आहे, आजवर ज्या-ज्या शेतकर्यांनी आणि लोकांनी भेटून निवेदन दिले, चर्चा केली, त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो की, आमदार महेश शिंदे यांनी या बाबी महाविकास आघाडी सरकारच्या निदर्शनास आणून दिलेल्या असून, कोरोना काळात कामकाज बंद राहिल्याने, त्याबाबत निर्णय होऊ शकलेले नाहीत. नजिकच्या काळात म्हणजे अगदी दोन ते तीन महिन्यात सेंद्रीय शेतीच्या प्रमाणाकिरणाचा निर्णय होणार आहे. त्याबाबत सर्व प्रक्रिया मंत्रालयपातळीवर सुरु आहे. आले संशोधन केंद्राबाबत लवकरच सर्वेक्षण केले जाईल आणि शेतकरी हिताचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे ना. भुसे यांनी निदर्शनास आणून दिले.
आ. महेश शिंदे म्हणाले की, दुष्काळी भागाला वरदान ठरणारी जिहे-कठापूर योजना येत्या काही दिवसात कार्यान्वित होत आहे, त्यामाध्यमातून खटाव तालुक्याचा शेतीपाण्याचा प्रश्न काही अंशी सुटत असला तरी या योजनेतून भाडळे तलावात पाणी आणल्यास कोरेगावचा दुष्काळी भाग देखील ओलिताखाली येणे शक्य होणार आहे. वसना-वांगणा उपसा जलसिंचन योजना ही तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झालेली नाही, अभियंत्यांनी प्रयत्न करुन देखील अपेक्षित क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही. आपण कोणाचे पाणी मागत नाही, तर आपल्या हक्काचे पाणी आपण जिहे-कठापूर योजनेतून घेण्यासाठी आग्रही आहोत, त्यादृष्टीने मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्यापुढे सादरीकरण करण्यात आले आहे, याबाबत कृषी मंत्री या नात्याने ना. दादाजी भुसे यांनी लक्ष घातल्यास कोरेगावच्या दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. शेती जगवायची असेल तर केवळ पाणी असून चालणार नाही, तर पुरेसी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकर्यांच्या वीज कनेक्शनसाठी 9 कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर झाले असून, कोरेगाव मतदारसंघासाठी त्यातील दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत, त्यामुळे विजेचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.
कोरेगाव मतदारसंघात शेती व्यवसाय बळकट केला जाणार असून, शेती व्यवसायात नव्याने आलेल्या उच्चविद्याविभुषित तरुणांना देखील योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी हा जगाचा तारणहार आहे, त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्व ते शक्य केले जाणार आहे. शेततळ्यांच्या माध्यामूत शेती पिकवण्याबरोबरच मत्स्यशेतीला चालना दिली जाणार असून, एक हजार शेततळी तयार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शेतीत आता नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे, त्यासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आम्ही मतदारसंघात कृषी विभागाच्या योजना अधिक गतीने राबवत असून, त्यादृष्टीने सर्वांनी संघटीत होऊन ऍग्रो प्रोड्युसर कंपनी, सेंद्रीय शेतीसह अनेक योजना असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आ. महेश शिंदे यांनी केले.
जनतेने आपल्याला आमदार केले असून, निवडणुकीपूर्वी मी शब्द दिला होता की, जनता हीच आमदार असेल, त्याप्रमाणे जनतेने उत्स्फूर्तपणे विजयी केल्यानंतर आमदार म्हणून मिळणारा पगार काय करायचा, असा प्रश्न मी माझ्या सहकार्यांना विचारला होता, त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पाणंद रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षात 580 किलोमीटर पाणंद रस्ते तयार करण्याचा निर्धार असून आतापर्यंत 136 किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत. किन्हई परिसरात तर चकाचक रस्ते झाले आहेत. पूर्वी एक पॉकलेन या कामासाठी होता, आता दोन पॉकलेन आले असून, लवकरात लवकर सर्वच रस्ते पूर्ण होतील, असेही आ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी प्रा. नितीन बानुगडे-पाटील, प्राचार्य अनिल बोधे, अशोक चिवटे, चांगदेव मोरे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. बापूसाहेब शेळके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृषी विभागाचे विविध पुरस्कार मिळालेल्या शेतकर्यांचा ना. दादाजी भुसे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
थांबा आम्ही पण कारखाना काढतोय
आमदार महेश शिंदे यांनी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम काही दिवसात सुरु होत आहेत, त्यापार्श्वभूमीवर काही ऊस उत्पादक शेतकर्यांना, वाहतूकदारांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणत्याही कारखान्याचे नाव न घेता, टीका केली. ऊसाची जिरवा जिरवी काय करताय, आम्ही सुध्दा मनात आणले तर जिरवू शकतो, मात्र आम्ही तसे करणार नाही. लवकरच आम्ही पण कारखाना काढतोय, वेळ आल्यावर सर्व काही स्पष्ट करु, असे ते म्हणताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.