
स्थैर्य, सातारा, दि. 28 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील धार्मिक सलोखा व सामाजिक विण बिघडवणार्या विघ्नसंतोषी उमेदवारांना तसेच जात्यांध व धर्मांध शक्तींना पाठीशी घालणार्यांना येत्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनी मतदान करू नये व भारतीय संविधानाची तत्वे स्वीकारणार्या उमेदवारालाच मतदान करावे असे आवाहन सातारा जिल्ह्यातील विचारवंत , साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते , वकील , महिला कार्यकर्त्या , युवक कार्यकर्ते यांनी सातारा जिल्ह्यातील स्त्री पुरुष मतदारांना केले आहे.
सातारा जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करणार्या आवाहन पत्रकावर ज्येष्ठ प्रा डॉ भास्करराव कदम , सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक जयंत उथळे , मिनाज सय्यद व विजय मांडके , प्रसिद्ध विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गलांडे , श्रीमती सलमा कुलकर्णी मोरे ,जयवंत खराडे , आरिफ बागवान , प्रदीप मोरे , विजय पवार , दिलीप ससाणे , तोसिफ शेख , संपतराव गायकवाड , विशाल मदने , मयूर खराडे व इतर मान्यवरांच्या सह्या आहेत.
आवाहन पत्रकात असे म्हटले आहे की सातारा जिल्ह्यात जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्यासाठी विशिष्ट धर्माविरोधात मोहीम आखली जात होती आणि राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यावेळी मूक बसले होते. हिंदू जनजागृती मोर्चा काढणार्यांना दुसर्या धर्मातील मतदार बंधू भगिनींना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे मतदारांनी याचा गांभीर्य आणि विचार करावा.
आपला मताधिकार वापरताना संविधानाने समता , बंधुता , न्याय विज्ञाननिष्ठा , धार्मिक सलोखा ही तत्वे अंगीकारायला सांगितली आहेत. त्याला कृतीशील पद्धतीने स्वीकारणार्या उमेदवारालाच मत द्यावे , जात्यांध व धर्मांध प्रवृत्तीच्या उमेदवारांना मत देऊ नये , हिंदू विरुद्ध मुस्लिम , हिंदू विरुद्ध बौद्ध , हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असे वातावरण तयार व्हावे यासाठी खतपाणी घालणार्या उमेदवाराला मत देऊ नका , रस्ते ,पाणी , आरोग्य , स्वच्छता , बंदिस्त व भुयारी गटर्स याचबरोबर नगरपालिकेच्या किंवा नगरपंचायतीच्या शाळांचा विकास कसा होईल , त्याचा दर्जा कसा वाढेल हे पाहणार्या उमेदवारालाच मत द्या , महिलांच्या व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेची हमी देणार्या उमेदवारालाच मताची हमी द्या , महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय करणार्यांनाच मतदान हा निर्धार करावा. कोणत्याही प्रकारे पैशाचे आमिष दाखवणारांना त्यांची जागा दाखवून द्यावी तसेच भ्रष्टाचारी , गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना मत देऊ नये असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे.

