स्थैर्य, सातारा, दि.०१: जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आज जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीत ना. पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारी १५ लाख रुपये रक्कम डीपीडीसीमधून जलसंपदा विभागाला देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे. चालू अधिवेशनदरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांना बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसे लेखी पत्रही त्यांना दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून ना. पवार यांनी आज बोंडारवाडी प्रकल्पासंदर्भात जलसंपदा आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, जलसंपदा विभागाचे सचिव एस. के. घाणेकर, सातारा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
जावली तालुक्यातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. बैठकीत बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत ना. पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला केल्या. दरम्यान, प्रस्ताव तयार करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर ना. पवार यांनी १५ लाख रुपये तातडीने डीपीडीसीमधून जलसंपदा विभागाला देण्याची सूचना साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. येत्या महिनाभरात बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करा अशा सूचना ना. पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार होऊन शासनाकडे सादर होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.