
फलटण नगरपरिषदेच्या आगामी सभेत वास्तूंची नावे बदलण्याच्या विषयावर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, महापुरुषांबद्दल आदर व्यक्त करत जुनी नावे न बदलता नव्या वास्तूंना महापुरुषांची नावे देण्याची मागणी काही नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २३ मार्च : फलटण नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारती आणि सभागृहांना दिलेली पूर्वीची नावे न बदलता, शहरातील नवीन किंवा अद्याप नाव नसलेल्या वास्तूंना आणि रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी सामंजस्याची भूमिका मांडणारे एक सविस्तर निवेदन फलटणचे नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. आगामी २५ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ९ च्या अनुषंगाने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
महापुरुषांबद्दल नितांत आदर, पण जुनी नावे बदलू नयेत
सध्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीला दिलेले ‘महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर भवन’ हे नाव बदलून त्यास ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’ असे नाव देणे, तसेच ‘श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहा’चे नाव बदलून ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले सभागृह’ करणे, ‘श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहा’चे नाव बदलून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह’ करणे, ‘श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर’ला ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटर’ आणि ‘संजीवराजे नगर’ला ‘छत्रपती सईबाई महाराणी साहेब नगर’ अशी नवीन नावे देण्याचा विषय प्रस्तावित आहे.
यावर निवेदनात अत्यंत स्पष्ट आणि आदराची भूमिका मांडताना म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराणी सईबाई साहेब यांच्याविषयी आम्हा सर्वांना अत्यंत आदर आहे. या महापुरुषांची नावे शहराच्या एखाद्या भागाला, चौकाला किंवा नव्या वास्तूला दिल्यास आमचा त्याला निश्चितच पाठिंबा असेल. मात्र, पूर्वीची दिलेली नावे बदलून त्याऐवजी ही नावे देणे संयुक्तिक वाटत नाही. पूर्वीची नावे तशीच ठेवून नव्याने तयार होणाऱ्या इमारती किंवा अद्याप नाव नसलेल्या वास्तूंना महापुरुषांची नावे दिल्यास त्या नावाला अधिक शोभेल.”
शॉपिंग सेंटरच्या नावामागील कृतज्ञतेची भावना
‘श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर’च्या नावामागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या छोट्या आणि टपरीधारक व्यापाऱ्यांचे तिथे न्यायालयातून योग्य पुनर्वसन करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेत आ. श्रीमंत रामराजे यांनी शासन स्तरावर ठोस भूमिका घेऊन व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. याच कृतज्ञतेपोटी त्या शॉपिंग सेंटरला त्यांचे नाव देण्यात आले होते.
शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक व नगरपरिषद मालकीच्या ज्या इमारतींना अद्याप नावे दिलेली नाहीत, त्या ठिकाणी संकल्पनेप्रमाणे महापुरुषांची नावे द्यावीत, त्याला सर्वांचा पाठिंबा राहील. मात्र, सहानभुतीपूर्वक विचार करून जुनी नावे बदलण्याचा ठराव मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर सौ. स्मिता संग्राम शहा, श्री. अझरुद्दीन ताजुद्दीन शेख यांच्यासह जयकुमार प्रकाश रणदिवे, किशोर प्रल्हाद तारळकर, अशोक (शक्ती) भोसले, बाबासो हरिभाऊ जाधव, अभिजीत निंबाळकर, विक्रम शशिकांत मदने आदी नागरिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
