कोरोनाच्या अंत्यसंस्कारामुळे स्थानिकांना त्रास होऊ देऊ नका; जयकुमार शिंदे व गोविंद भुजबळ यांची मागणी


स्थैर्य, कोळकी, दि. २२ : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अश्यामध्ये कोरोना या दुर्दैवी आजारामुळे फलटण तालुक्यात साधारणपणे रोज दहा जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना आजरामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार हे फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून कोळकी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीमध्ये होत आहेत. फलटण नगरपरिषदेकडून अंत्यसंस्कार करताना तेथे काळजी घेतली जात नाही. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीच राख हि शेजारील कॅनॉल मध्ये टाकली जात असल्याचे दिसून आलेले आहे. कोळकी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीच्या शेजारी राहणारे व शेतजमीन असणाऱ्यांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी ह्या पुढे कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार करताना शेजारी राहणारे व शेतजमीन असणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे व सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ यांनी दिलेला आहे.

कोळकी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीच्या शेजारी राहणारे व शेतजमीन असणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या बाबत भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे व सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ यांनी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांची भेट घेऊन या बाबत सविस्तर निवेदन दिले. या वेळी रामभाऊ शेंडे, रणजीत जाधव, प्रदीप भरते, गोरख जाधव, अजय भुजबळ, निलेश भुजबळ, विजय भुजबळ, महेश भुजबळ, राजेंद्र पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!