स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि . २१ : “हे विश्वचि माझे घर” अशी विश्वव्यापक दृष्टी असणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी ‘श्री ज्ञानेश्वरी’ रूपी अनमोल ग्रंथाची निर्मिती करून सकल मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. माऊलींची ही ज्ञानेश्वरी म्हणजे समाधानी जीवनाचा राजमार्ग आहे असे मत ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( रविवार ) नवव्या दिवशी अहमदनगर येथील ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री यांनी राजविद्याराजगुह्ययोग या नवव्या अध्यायावर निरूपण केले .
ह भ प शास्त्री म्हणाले ,
ज्ञानेश्वरी म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत, दृष्टांतपूर्वक गीताशास्त्रावर माऊलींनी चढवलेला अलंकार होय. ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊलींनी गीताशास्त्रातील ज्ञानमय प्रकाश विद्वानांपासुन तर अगदी सर्वसामान्यांपर्यंत सहजपणे पोहचवला आहे. ज्याच्यापुढे वेदांचे शब्दही कुंठीत झाले, तो गीतार्थ माऊलीनी अत्यंत समर्थपणे मराठीत सांगितला आहे.
गीतेचे अठरा अध्यायांमध्ये ९ व्या अध्यायाचे विशेष महत्व आहे. सर्व विद्यांचा राजा असलेले अद्वैत ज्ञान भगवंताने अर्जुनाला या अध्यायात सांगितलेले आहे. म्हणूनच या अध्यायाला राजविद्याराजगुह्ययोग असे म्हणतात.
माऊली ज्ञानोबारायांनी अद्वैत
तत्वज्ञानाचा गाभा, उत्कट भगवत् भक्तांची लक्षणे आणि जो भगवंताची शरणागती स्वीकारतो त्याचा सर्व भार भगवान स्वीकारतो यांवर अतिशय सुंदर विवेचन या अध्यायात केले आहे.
भगवंताच्या अंतःकरणातील अतिगुहय असे ज्ञान त्यांनी अर्जुनाला सांगितले आहे, आणि अर्जुनाच्या निमित्ताने ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. हे ज्ञान समजून घेण्यासाठी चित्ताची एकाग्रता अत्यंत आवश्यक असल्याने माऊली प्रारंभीच म्हणतात,
तरी अवधान एकले दीजे ।
मग सर्व सुखांसी पात्र होईजे ।
जे तत्वज्ञान जाणले असता मनुष्य परमानंद स्वरूपाला जाऊन पोहोचतो. ते तत्त्वज्ञान कसे आहे? हे माऊलींनी विविध रूपके, दृष्टांत यांद्वारे समजावून दिले आहे. या कार्यक्रामाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .
आज सोमवार दि . २२ रोजी अकलूज ( जि सोलापूर ) येथील ह भ प सुरेश महाराज सुळ हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या विभूतीयोग या दहाव्या अध्यायावर निरुपण करतील .
दरम्यान रविवारी पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. दुपारी चाकणकर , रात्री वासकर फडाच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री सोपानकाका कराडकर यांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली.