
स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : फलटण येथील लक्ष्मीगनरमधील प. पू. श्री गोविंदमहाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या वतीने ‘श्रीं’च्या ५१ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताहव्यापी सोहळा रविवार, दि. ७ सप्टेंबर ते रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून, यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अखंड हरिनाम व पारायण सोहळ्याचा शुभारंभ रविवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता होणार आहे. याप्रसंगी वीणापूजन संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच व्यासपीठाचे पूजन ह.भ.प. सौ. पुष्पाताई कदम आणि ह.भ.प. सौ. निर्मलाताई काकडे यांच्या हस्ते संपन्न होईल.
सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी विविध महिला भजनी मंडळांची कीर्तने आणि सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. “श्री संत ज्ञानेश्वर महाराज: चरित्र व चिंतन” या विषयावर आळंदी येथील ह.भ.प. श्री स्वामी शंकर नाथ महाराज यांची अभ्यासपूर्ण प्रवचने होणार आहेत. तसेच शनिवारी, दि. १३ सप्टेंबर रोजी ह.भ.प. कमलाकर महाराज भाटोळे (निंबसोड) यांचे ‘श्रीं’च्या फुलांचे कीर्तन होईल.
सोहळ्याचा मुख्य दिवस आणि सांगता समारंभ रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी पार पडेल. या दिवशी सकाळी लघुरुद्र, गीता पठण, पसायदान आणि ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होईल. दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ‘श्रीं’चा फुलांचा कार्यक्रम आणि पालखी सोहळा (नगर प्रदक्षिणा) हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अनिरुद्ध अरविंद रानडे, सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर तसेच सर्व सदस्य या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.