डीएनए व ध्वनी विश्लेषण विभाग राज्यात अव्वल ठरावा – पालकमंत्री सतेज पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । कोल्हापूर । प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापूर, गृह विभाग अंतर्गत डीएनए, संगणक गुन्हे आणि ध्वनी व  ध्वनीफित विश्लेषण विभाग आपल्या कार्यक्षमतेद्वारे राज्यात अव्वल ठरावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीमध्ये DNA , सायबर तसेच ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण विभागाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आ. चंद्रकांत जाधव, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, MGP चे अधिक्षक अभियंता व्ही. एल. कुलकर्णी, सहायक संचालक दीपक जोशी, श्रीकांत लादे, पीडब्लुडीचे कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, सध्या सायबर गुन्हे वाढले असून या लॅबमुळे त्याची उकल होण्यास तसेच सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मधील संगणकीय गुन्हे कमी होण्यास मदत होईल. पीडीत व्यक्तीच्या न्यायदान प्रक्रियेत लॅबचे महत्वाचे योगदान ठरते त्यासाठी सँपल कलेक्शन गोळा करणे महत्वाचे असते, यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने त्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. सध्या ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार वाढले असून या संदर्भात बॅंकांना निर्देश देण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले कसबा बावडा येथील बझार लाईनमध्ये ज्या 240 क्वार्टरची उभारणी प्रस्तावित आहे. त्यातील काही क्वॉर्टर FSL (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) साठी राखीव ठेवण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल . या लॅबच्या ठिकाणी लॅबशी संबंधित व्यक्ती वगळता इतरांना प्रवेशाबाबत मनाई करण्यात यावी अशी सूचना करून ते पुढे म्हणाले , या विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत लवकरच नियोजन करण्यात येईल .

न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक संदिप बिश्नोई यांनी राज्यातील सर्व लॅब ह्या देशात सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रास्ताविकात सांगितले तर सध्या राज्यात 8 डीएनए व इतर 5 मिनी लॅब कार्यरत असून कोल्हापूरात सुरु झालेल्या या लॅबमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यांतील सायबर व इतर गुन्हेगारीला आळा घालण्यासंदर्भात ही प्रयोगशाळा सहाय्यभूत ठरेल असा आशावाद या प्रयोगशाळेचे संचालक के. व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्त केला तर आभार उपसंचालक रा. ना. कुंभार यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!