
स्थैर्य, फलटण, दि. ०६ सप्टेंबर : शहराचे प्रमुख दैवत असलेल्या श्री जबरेश्वर महादेव मंदिराच्या परिसरातून गणेश विसर्जन मिरवणूक नेण्यावर निर्बंध घालण्याची मागणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केली आहे. मिरवणुकीतील डीजेच्या भिंतीभेदी आवाजामुळे मंदिराच्या प्राचीन संरचनेला धोका पोहोचू शकतो, असे नमूद करत विभागाने फलटण नगरपरिषदेसह जिल्हा प्रशासनाला रीतसर पत्र पाठवले आहे. मात्र, याच डीजेच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पत्रानुसार, जबरेश्वर महादेव मंदिर हे केंद्र संरक्षित स्मारक असून, त्याच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी विभागाची आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम, १९५८ नुसार संरक्षित स्मारकांच्या परिसरात नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या कृतीस प्रतिबंध आहे. या कायद्याचा संदर्भ देत, डीजेच्या प्रचंड ध्वनी कंपनांमुळे मंदिराच्या वास्तूला होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासनाने मिरवणुकीवर निर्बंध घालावेत, असे पत्रात म्हटले आहे.
एकीकडे पुरातत्व विभाग ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पत्र देत असताना, दुसरीकडे याच डीजेच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांमधून आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून पोलिसांच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे यांनी पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारावर टीका केली आहे. “फलटण तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. शहरातील काही भागात उभ्या केलेल्या डीजेच्या भिंतींमुळे नागरिकांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे,” असे शिंदे म्हणाले.
“नागरिकांची सुरक्षा करण्याचा शब्द फलटण शहर पोलीस निरीक्षकांनी माध्यमांसमोर राणा भीमदेवी थाटात दिला होता, मात्र तो पोकळ ठरला आहे. अशा गंभीर परिस्थितीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे, त्यांना सातारा जिल्ह्याचा पदभार देताना फलटण तालुक्याचे कार्यक्षेत्र वगळून पदभार दिला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे,” अशा शब्दात शिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

