स्थैर्य, सातारा, दि.७ : दिवाळी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा सण. कोरोना संपला नसला तरी दिवाळी ही होणारच. त्यामुळेच बाजारपेठ अन् घरोघरी दिवाळीची चाहूल लागली असून सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गाला दिवाळीसाठी दिलासा मिळेल. बाजारपेठही सज्ज होत आहे. सध्या बाजारपेठेत कापड, किराणा, फर्निचर, वाहन विक्रीसह खेळण्याची दुकाने सजण्यास प्रारंभ झाला आहे. फराळाचे पदार्थ करण्यासाठी महिलाही सरसावल्या आहेत.
दिवाळीसाठी सर्वांचा उत्साह असला तरी यावर्षीच्या दिवाळीवर नाही म्हटले तरी कोरोनाचे संकट आहेच. तरीही दिवाळी साजरी होणारच आहे. दिवाळी म्हटले की बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहू लागतो. त्यांची दिवाळी किल्ल्यापासून सुरू होते. त्यामुळेच सध्या राजवाडा परिसरात किल्ल्यावरील खेळण्यांचे स्टॉल लागले आहेत. अद्याप फटाक्यांचे स्टॉल लागलेले नाहीत. कोरोनामुळे बरेच दिवस उत्तर प्रदेशातील फटाके बनवणारे कारखाने बंद होते. त्याचा परिणाम फटाक्यांच्या उत्पादनावर झाला आहे. दरातही काही अंशी वाढ होण्याची शक्यता येथील फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. कपड्यांची दुकानेही आता चकाकू लागली असून ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
दरम्यान, यावर्षी अवेळी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे
मोठे नुकसान झाले आहे. सर्वच पिकांना फटका बसला आहे. मात्र, सध्या
सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. 15 दिवसांपूर्वी 3,500 ते 3,600 रुपये
क्विंटल असलेला दर आता 4,100 ते 4,200 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी बहुतेक महिला फराळाचे पदार्थ घरी करण्यावर भर देतात. मात्र, अनेक
नोकरदार महिलांना हे पदार्थ घरी करणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजारात
मिळणारे पदार्थ त्यांना आणावे लागतात. या महिलांची गरज भागविण्यासाठी
बाजारपेठेत दरवर्षी फराळाचे तयार पदार्थ मिळतात. यावर्षीही मिठाई विक्रेते
आणि बचत गटाच्या महिलांनी पदार्थ तयार करण्यास प्रारंभ केला आहे. बचत
गटांच्या महिला आता व्हॉट्सऍपसह सोशल मीडियाचा वापर करत जाहिराती करू
लागल्या आहेत.