दिवाळी संपली चाकरमानी परतले : सातारा बसस्थानकात प्रवाशांच्या रांगा


सातारा : बसस्थानकावर झालेली प्रवाशांची गर्दी. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि.27 ऑक्टोबर : वर्षातील सर्वात मोठा असा दीपोत्सव अर्थात दिवाळीचा सण साजरा करून चाकरमनी आता पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत. त्यामुळे रविवारी सायंकाळी सातारा मध्यवर्ती बस स्थानकात अशी हजारोंच्या संख्येने प्रवाशांची बसच्या प्रतीक्षेसाठी लांबच लांब रांग पाहायला मिळाली. अनेक आणि आगाऊ नोंदणी करूनही गाड्या भरभरून जात होत्या, त्यामुळे अनेकांना दोन ते तीन तास नव्या वाहनाची प्रतीक्षा करावी लागली. सातारा मध्यवर्ती बस स्थानकाने यासाठी पुण्याला जाण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केल्यामुळे 15 मिनिटाला गाडी सोडली जात होती.

दिवाळी सणाच्या सुट्टीसाठी गावी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

दिवाळी सणानिमित्त चाकरमनी गावाकडे आले होते. सोमवारपासून शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू होत असल्याने चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे सातारा बसस्थानक रविवारी सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. स्वारगेट, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. जादा बसेस सोडल्या तरी प्रवाशांच्या रांगा हटत नव्हत्या.

स्वारगेटसाठी दर 10 मिनिटाला सातारा आगारातून बस सोडण्यात येत होती. लांब पल्यासह अन्य ठिकाणी धावणार्‍या बसेस हाऊसफूल्ल होत्या. प्रवाशी उभे राहून प्रवास करताना दिसत होते. महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे एसटी बसेसचे वेळापत्रकही कोलमडत होते. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता. सातारा बसस्थानकात तर प्रवाशांना एसटी बसेसची वाट पहात बसावे लागत होते. मात्र आलेली एसटी पुन्हा प्रवाशांनी भरल्यानंतर विविध मार्गावर पाठवण्यात येत होती. मात्र फलटण येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी सातारा विभागातून सुमारे 350 हून अधिक बसेस संबंधित पक्षाने आरक्षीत केल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमासाठी बसेस गेल्याने प्रवाशांच्या खोळंबा झाला होता. मात्र सायंकाळनंतर पूर्ववत एसटीची सेवा सुरळीत सुरू झाली.
दरम्यान स्वारगेटसाठी सातारा आगारातून 15 फेर्‍या कोरेगावच्या 6, खंडाळा 4, वाई 4, मेढा 6, वडूज 5, दहिवडी 5, अशा 45 बसेस जादा सोडण्यात आल्या शिवाय रोजच्या 58 फेर्‍याही स्वारगेट मार्गावर धावल्या. स्वारगेटसाठी महाबळेश्वर आगारातून 5, वाई आगारातून 8, कराड आगारातून 17,फलटण आगारातून 10 फेर्‍या सोडण्यात आल्या. तरीही रात्री उशिरापर्यंत पुणे व मुंबईसाठी प्रवाशांची गर्दी कायम होती.


Back to top button
Don`t copy text!