दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | सातारा | ऐन दिवाळीच्या सणात चोरट्यांनी सातारा शहरात धुमाकूळ घातला आहे. गोडोलीतील साईमंगल साईमंगल अपार्टमेंटमधील २ फ्लॅट फोडले, तर बॉम्बे रेस्टॉरंट चौकजवळील टेक्साईल शोरुममध्येही चोरी केली आहे. या दोन घटनांमध्ये २ लाख रुपये किंमतीचे सोने, चांदी यासह रोख ६० हजार रुपयांची चोरी केली आहे. या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोडोली येथील फ्लॅट चोरीप्रकरणी वैभव अनिल मस्के (वय ३३, रा. गोडोली, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ रोजी तक्रारदार यांच्यासह काही जणांचे फ्लॅट बंद होते. अज्ञात चोरट्यांनी अपार्टमेंटमधील तक्रारदार व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांच्या घरी चोरी केली. ही घटना दि. २ रोजी समोर आली. तक्रारदार मस्के यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले होते. या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पाहणी करुन ठसे तज्ज्ञाला पाचारण केले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता घरातून चोरट्यांनी सोन्याचा ऐवज लांबवल्याचे समोर आले. यामध्ये २ मिनी गंठण, २ मोठे सोन्याचे गंठण, सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, मनगट्या, कानातल्या रिंगा, चांदीचा छल्ला, टॉप्स, सोन्याची चेन, चांदीचे जोड अशाप्रकारे दोन्ही फ्लॅटमधील तब्बल २ लाख रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
टेक्सटाईल येथील चोरीप्रकरणी राजेंद्रकुमार शामराव जगदाळे (वय ४४, रा. सदरबझार) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात चाहूर फाटा येथे चैतन्य टेक्सटाईल हे दुकान आहे. दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी दुकान बंद केले. दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आतमध्ये जावून पाहणी केली असता ड्रॉव्हरमधील रोख ६० हजार रुपये, दोन डीव्हीआर व इतर साहित्य असे १ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.