उदयनराजेंकडून कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी गिफ्ट’; घेतला महत्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.५ : कोरोना काळातील यंदाची दिवाळी पालिका कर्मचाऱ्यांना गोड जावी, यासाठी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 16 हजार आणि कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार असे एकूण 17 हजार रुपयांचे अनुदान देण्याबाबत नगराध्यक्षा माधवी कदम यांना आम्ही सूचना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसांत या रकमेचे कर्मचाऱ्यांना वितरण केले जाईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. 

उदयनराजे म्हणाले, “आमचे वडील प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज हे या नगरीचे प्रथम नागरिक होते. त्याही पूर्वीपासून सातारा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, असे आम्ही समजतो. सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी आमचे ऋणानुबंधाचे संबंध असून, ते कधीही संपणारे नाहीत. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सुख-दु:खात आम्ही नेहमीच सहभागी असतो. यंदाची कोरोना काळातील दिवाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गोड जावी म्हणून सातारा म्युनिसिपल कामगार युनियन, लाल बावटाचे अध्यक्ष ऍड. धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष श्रीरंग घाडगे आदींच्या बरोबर चार दिवसांपूर्वीच आम्ही चर्चा केली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांवर सातारा पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले आहेत. सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राचे निर्जंतुकीकरण, शहर आणि पेठांमध्ये केलेली औषध फवारणी, सार्वजनिक स्वच्छता, लॉकडाउनच्या काळात ऐन उन्हाळ्यात केलेला अखंडित आणि पुरेसा पाणीपुरवठा, दैनंदिन नागरी सुविधा बंदच्या काळातही सुरूच होत्या.” 

सातारा पालिकेचे कर्मचारी विशेषकरून चतुर्थश्रेणी कर्मचारी हे नेहमीच आपल्या नागरिकांच्या हिताकरिता अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या कर्तव्य भावनेला आमचा सलाम आहे. याच भावनेतून पालिकेची आर्थिक स्थिती कोरोनामुळे समस्येच्या गर्तेत असली तरी देखील कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या स्नेहभावामुळे आम्ही दिवाळीचे सानुग्रह अनुदान रुपये 16 हजार प्रत्येकी देण्याबाबत संघटनेशी चर्चा केली आहे. कोरोना प्रोत्साहन म्हणून रुपये एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. असे मिळून प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर एकूण रुपये 17 हजार दिले जाणार आहेत. त्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत या रकमेचे वितरण करण्यात येईल, असेही उदयनराजे यांनी नमूद केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!