दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२४ | सातारा |
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. या दिवशी गाय व वासरांची गोमाता स्वरूपात पूजा करून तिला आवडीचे खाद्यपदार्थ घातले जातात. महिला, सुवासिनी गाय-वासराचे औक्षण करून त्यांचे पाय धुवून त्यांना हिरव्या चार्याचा घास भरवतात आणि त्यांच्याकडून अखंड सौभाग्यप्राप्तीचे दान मागतात. अशीही वसुबारस अर्थात गोवत्स पूजनाने यावर्षीच्या दीपोत्सवाला म्हणजे दिवाळी सणाला प्रारंभ झाला.
सातारा शहरातील श्री पंचपाळे हौद, दुर्गामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने शहरात गाय-वासरू पूजनासाठी उपलब्ध करण्याची परंपरा यावर्षी सुरू ठेवली होती. मंदिरालगत भव्य मंडप उभारून फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात दहा गाय-वासरांच्या जोड्या पूजनासाठी उपलब्ध केल्या होत्या. सकाळी ९ वाजल्यापासून महिलांनीही मोठ्या उत्साहाने या गाय-वासरांचे पूजन करून त्यांच्या खाद्यासाठी काही रक्कम भेट स्वरूपात दिली. अनेकांनी तर गाईंना चारा म्हणून पेंड, सरकी, बाजरी, गुळ पदार्थ भेट स्वरूपात दिले.
सातारा शहरातील पंचपाळे हौद दुर्गामाता मंदिरात वास्तव्यास असलेल्या दोन गाईंच्या जोड्यांसह समर्थ मंदिर परिसरातील गवळीवाडा तसेच सोनगाव आणि जकातवाडी येथील नावडकर परिवाराच्या या गाय-वासरांच्या पूजनासाठी सातारा शहरातील महिलांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. दीपावलीनिमित्त या मंदिरास विशेष विद्युत रोषणाईचा साज चढवण्यात आला असून दरवर्षी गोवत्स पूजन झाल्यानंतर खर्या अर्थाने दीपावलीला सुरुवात होते. त्यामुळे महिलांनी एकमेकीला हळदी-कुंकू लावून सौभाग्य वाण देत दीपावलीच्या शुभेच्छा देत हा वसुबारसेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
यानंतर धनत्रयोदशी आज मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी संपन्न होत असून ३१ ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी, १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आणि तीन नोव्हेंबरला भाऊबीज असे सलग चार दिवस दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.