गोवत्स पूजनाने  दीपावली सणाला प्रारंभ


सातारा – येथील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या गोवत्स पूजन सोहळ्यात गाय वासरांची पूजा करताना महिला सुवासिनी. (छायाचित्र – अतुल देशपांडे सातारा)

स्थैर्य, सातारा, दि.18 ऑक्टोबर : सालाबाद प्रमाणे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी साजरी केली जाते .या दिवशी गाय व वासरांची गोमाता स्वरूपात पूजा करून तिला आवडीचे खाद्यपदार्थ घातले जातात .महिला, सुवासिनी गाय वासराचे औक्षण करून त्यांचे पाय धुवून त्यांना हिरव्या चार्‍याचा घास भरवतात आणि त्यांच्याकडून अखंड सौभाग्य प्राप्तीचे दान मागतात .अशीही वसुबारस अर्थात गोवत्स पूजनाने यावर्षीच्या दीपोत्सवाला म्हणजे दिवाळी सणाला प्रारंभ झाला ..
सातारा शहरातील श्री पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने शहरात गाय -वासरू पूजनासाठी उपलब्ध करण्याची परंपरा यावर्षी सुरू ठेवली होती. मंदिराच्या लगत भव्य मंडप उभारून फुलानी सुशोभित केलेल्या मंडपात या 11 गाय -वासरांच्या जोड्या पूजनासाठी उपलब्ध केल्या होत्या. सकाळी नऊ वाजल्यापासून महिलांनीही मोठ्या उत्साहाने या गाय वासरांचे पूजन करून त्यांच्या खाद्यासाठी काही रक्कम भेट स्वरूपात दिली तर अनेकांनी गाईंना चारा म्हणून पेंड, सरकी ,बाजरी, गुळ पदार्थ भेट स्वरूपात दिले .
सातारा, जकातवाडी, सोनगाव येथील या गाय वासरे मंदिर ट्रस्ट तर्फे दरवर्षी उपलब्ध केल्या जातात. सतीश मुळे, सचिन जांभळे ,बजरंग अवकीरकर , श्री.शिळीमकर यांच्या गाय वासराच्या जोड्या या पूजनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या प्रांगणात असलेल्या दोन गाई व त्यांची वासरे ही या पूजनासाठी उपलब्ध करण्यात आली होती. महिलांनी सकाळपासूनच गाय वासरांचे पूजनासाठी गर्दी केली होती ,महिलांनी हळद कुंकू, गाय वासराचे पूजन करताना त्यांचे वर वाहून पाण्याने पाय धुतले. तसेच त्यांना हिरवी भाजी, कोथिंबीर, मेथी, पालक खाऊ घातल्या. तसेच पंचारतींनी औक्षण करून त्यांना बाजरी आणि गुळही दिला .तसेच अनेक भक्तांनी गाय वासरांच्या खाद्यासाठी पशुखाद्य, पेंड तसेच सरकी पेंड ह भेट स्वरूपात दिली .तसेच अनेक भक्तांनी रोख स्वरूपात देणगी गाय वासरांच्या सेवेसाठी प्रदान केली .या उपक्रमाबद्दल माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले की हा उपक्रम दरवर्षी अधिकच वृद्धिंगत होत असून महिलांना या पूजनासाठी गाय वासरू उपलब्ध करून देण्याची प्रथा गेली पंधरा वर्षे मंदिर ट्रस्टने सुरू ठेवली आहे.

दीपावलीनिमित्त या मंदिरास विशेष विद्युत रोषणाईचा साज चढवण्यात आला असून दरवर्षी गोवत्स पूजन झाल्यानंतर खर्‍या अर्थाने दीपावलीला सुरुवात होते. त्यामुळे महिलांनी एकमेकीला हळदीकुंकू लावून सौभाग्य वाण देत दीपावलीच्या शुभेच्छा देत हा वसुबारसेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.


Back to top button
Don`t copy text!