शेतकऱ्यांना दिवाळीत बोनस! सातारा जिल्ह्याला 13.16 कोटी भरपाई मदत


 

स्थैर्य, सातारा, दि.१३ : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेती व मालमत्तेच्या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्याला 13 कोटी 16 लाख 49 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मदतीतून नऊ हजार 311 शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार आहे. मात्र, त्यासाठी 33 टक्के नुकसानीची अट असून, जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्‍टरी दहा हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्‍टरी 25 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसात झालेली अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचे पंचनामे करून शासनाकडे भरपाईसाठी पाठविण्यात आले होते. यासंदर्भात शासनाने काल निर्णय घेऊन सर्व जिल्ह्यांना भरपाईसाठी पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे विभागाला 388 कोटी 34 लाख 40 हजार रुपये भरपाईचे अनुदान उपलब्ध केले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला 13 कोटी 16 लाख 49 हजार रुपये मिळाले आहेत. यामध्ये अतिवृष्टीत मृत झालेल्या जनावरांच्या भरपाईपोटी पाच लाख 78 हजार, घरे, गोठ्यांच्या पडझडीच्या भरपाईसाठी 68 लाख 13 हजार, शेत जमिनीच्या नुकसानीपोटी एक लाख 53 हजार रुपये, तसेच शेती बहुवार्षिक पिकांच्या भरपाईसाठी आठ कोटी 60 लाख 98 हजार रुपये, तर वाढीव दराने शेती पिकांच्या भरपाईपोटी तीन कोटी 80 लाख सात हजार रुपये जिल्ह्याला मिळाले आहेत.

ही भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यायची आहे, तर भरपाई देताना 33 टक्के नुकसान झालेल्यांनाच मदत मिळणार आहे. यामध्ये बहुवार्षिक पिकांच्या भरपाईसाठी हेक्‍टरी 25 हजार रुपये, तर जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्‍टरी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. केवळ दोन हेक्‍टरच्या मर्यादेपर्यंतच भरपाई मिळणार आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. या मदतीत जिल्ह्यातील नऊ हजार 311 शेतकरी पात्र ठरले आहेत. यामध्ये फळबागधारक एक हजार 145, तर जिरायत व बागायती पिके असलेले आठ हजार 166 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

कोरोना, अतिवृष्टीने नुकसान यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीने ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे. आता जिल्हास्तरावरून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी सणापूर्वी ही भरपाई खात्यावर जमा झाल्यास शेतकऱ्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

…अशी मंजूर झाली नुकसान भरपाई 

  • मनुष्य हानीसाठी : भरपाई नाही

     

  • मृत जनावरांसाठी : पाच लाख 78 हजार

     

  • घरे व गोठ्यांची पडझड : 68 लाख 13 हजार

     

  • शेत जमीन नुकसानी पोटी : एक लाख 53 हजार

     

  • मत्स्य विकासासाठी मदत : भरपाई नाही

     

  • शेती बहुवार्षिक पिकांच्या भरपाईसाठी : आठ कोटी 60 लाख 98 हजार

     

  • वाढीव दराने शेती पिकांसाठीची भरपाई : तीन कोटी 80 लाख सात हजार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!