दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी सन 2022-23 या वर्षाकरिता 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज केली. दूरदृश्यप्रणाली द्वारे आज झालेल्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा अंतिम करण्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बाल भवन आणि दिव्यांग भवन उभारणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस मंत्रालयातून सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील दूरदृश्यप्रणालीद्वारे आमदार पृथ्वीराज चव्हाण, मंत्रालयातून राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव तथा सातारचे पालक सचिव ओ.पी. गुप्ता,पुणे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच सातारा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले, दिव्यांगांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे तसेच महिलांसाठीही महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे.राज्यात महसूल विभागाला आवश्यक ती वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. आर्थिक नियोजनाबाबत उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल विभागातील एका जिल्ह्यासाठी 50 कोटींचा अतिरिक्त निधीही (आव्हान निधी) देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येत असून सातारा शहराच्या सुशोभीकरणासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाबळेश्वर पर्यटन स्थळ व सैनिक स्कूलसाठी विशेष निधी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कामांचा दर्जा उत्तम राखला जाईल यासाठी यंत्रणांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेबरोबरच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व अन्य योजना मधून जिल्ह्यासाठी निधी दिला जाईल.रस्त्यांची आणि पुलांची कामे चांगली व दर्जेदार करण्याच्या सुचना ही श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्री महोदयांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी योग्य त्या कामासाठी खर्च केला जाईल याची दक्षता घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी 400 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी सन 2022-23 साठीच्या कमाल नियतव्यय मर्यादेनुसार रु. 314 कोटी 42 लक्षच्या आराखड्यामध्ये 85.58 कोटीची वाढ करुन रुपये 400 कोटीच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याचे ऑनलाईन सादरीकरण केले.