भाजपामध्ये जिल्हाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती; सातारा व माढाच्या निरीक्षक पदी राजेश पांडे
दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास; भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खा. अरुण सिंह यांनी केले प्रदेश भाजपाचे अभिनंदन; 22 एप्रिल पर्यंत एक लाख बुथ समित्यांचे गठन करण्याचे उद्दिष्ट

दैनिक स्थैर्य | दि. 18 एप्रिल 2025 | मुंबई | संघटन पर्वाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि 1 लाख 34 हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले आहे, अशा शब्दांत भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा.अरुण सिंह यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा व सोलापूर पश्चिमच्या (माढा) निरीक्षकपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन पर्व यशस्वी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खा. सिंह बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. सदस्य नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी श्री. सिंह म्हणाले की, पक्षाच्या 70 टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून 22 एप्रिलपर्यंत 1 लाखा पर्यंत बूथ समित्या गठन करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये 12 सदस्य असतात म्हणजेच 12 लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल. संघटन सर्वोपरि या विचारधारेने कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत लोकशाही असून सामुहिक निर्णय आणि परस्पर संवाद ही दोन वैशिष्ट्ये आहेत. संघटनशक्तीला बळ देण्यासाठी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी झोकून देऊन काम करत असल्याबद्दल श्री. सिंह यांनी कौतुक केले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तमपणे काम करीत असल्याचेही खा. सिंह यांनी नमूद केले.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जानेवारी 2025 पासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणीचे दीड कोटींचे लक्ष्य साध्य केले. आत्तापर्यंत जवळपास 1 लाख 40 हजार सक्रीय सदस्य झाले असून 3 लाख सक्रीय सदस्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जोमाने प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. 20 एप्रिल रोजी राज्यातील सर्व म्हणजे 1196 मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणूक होणार आहे. मंडल अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्यानंतर 22 एप्रिल पासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.
एवढा फायदा होणाऱ्या व्यवहाराची चौकशी होणारच
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून 7 कोटीला जमीन खरेदी केली. वाड्रा यांनी याच जमिनीची विक्री 4 महिन्यात त्याच कंपनीला 58 कोटीला केली. अवघ्या चार महिन्यात जमिनीची किंमत एवढी वाढवणारा व्यवहार केल्यावर त्याची चौकशी होणारच, असे खा. सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.