दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । सातारा । केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध 31 मार्च 2024 पर्यंत तर तूर व उडीद डाळींच्या अतिरिक्त साठ्यावरील निर्बंध 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली आहे.
कायदेशिर घटकांकडे असणारा गव्हाचा साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास तसे https://evegoils.nic.in/wsp/loging विभागाच्या या संकेतस्थळावर जाहिर करण्याचे आदेशित केले आहे. या अधिसुचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे.
कायदेशीर घटकांकडे असणारा डाळींचा साठा अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास, तसे fcainfoweb.nic.in या विभागाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या अधिसूचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत डाळींचा साठा कमी करणे आवश्यक राहील तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कायदेशीर घटकांची बैठक घेण्यात आली व आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी व साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी कळविले आहे.