
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लेझर लाईट आणि कर्णकर्कश आवाजातील ‘डीजे’वर बंदी घातली असताना, या आदेशाला फलटणमध्ये केराची टोपली दाखवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात निघालेल्या एका मिरवणुकीत लेझर लाईट आणि डीजेचा सर्रास वापर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीसाठी, ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा धोका टाळण्यासाठी लेझर लाईट आणि प्रेशर हॉर्नच्या वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी फलटणमध्ये होत आहे की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
एकीकडे फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी ‘डीजे’बाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले आहे, तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागातच नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे, पोलिसांनी आता केवळ सर्वेक्षणावर न थांबता, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.