
दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करुन सोहोळा शांततेत व सुरक्षीत पार पडेल यासाठी संपूर्ण व्यवस्था चोख ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी फलटण तालुक्यात ४ ही पालखी तळावर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्यात येत असून त्याद्वारे सोहोळा अधिक सुरक्षीत पार पाडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे दिसते.
पालखी सोहोळा मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही, मात्र सर्वांना सुलभतेने दर्शन घेता येईल याची व्यवस्था पुरेसा पोलिस बंदोबस्त आणि बॅरेगेटींग द्वारा करण्यात येणार आहे.
तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सोहोळा पोहोचण्यापूर्वी वॉच टॉवर आणि नियंत्रण कक्ष उभारुन संपूर्ण पालखी तळाची सुरक्षितता तपासून आवश्यक तेथे जादा पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पास देवून अन्य खाजगी वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करुन त्याबाबत सर्वांना योग्य प्रसिध्दी द्वारे माहिती देवून त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषत: सोहोळा मार्गक्रमण करताना वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करुन अत्यावश्यक सेवे शिवाय अन्य कोणत्याही प्रकारची वाहने पालखी मार्गावर येणार नाहीत याची विशेष दक्षता पोलिस यंत्रणेने घेतली असून पर्यायी मार्गाबाबत आगाऊ सूचना, त्याचे नकाशांसहित प्रसिद्ध करुन सहकार्य करण्याचे आवाहन नागरिक आणि वाहन चालकांना करण्यात आले आहे.
या संपूर्ण व्यवस्थेसाठी जादा पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा स्तरीय दंगा काबू पथक वगैरे यंत्रणांना पाचारण करण्यात आले असून जादा वाहने उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत.
या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धनंजय गोडसे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.