निंबळक येथील विलगीकरण कक्ष, लसीकरण व टेस्टिंग व्यवस्थेबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी ग्रामस्थांना दिले धन्यवाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.०५: निंबळक (ता.फलटण) कोरोना हॉट स्पॉट बनण्याच्या स्थितीतून बाहेर पडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्ष, ग्रामपंचायत कार्यालयातील लसीकरण केंद्र, महादेव मंदिरातील कोरोना टेस्टिंग वगैरे ठिकाणी भेट देवून जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी संपूर्ण व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करीत ग्रामस्थांना धन्यवाद दिले.

जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल यांनी फलटण शहरातील सजाई गार्डन कोरोना केअर सेंटर, मुधोजी हायस्कुल येथील लसीकरण केंद्र आणि निंबळक व तरडगाव येथील विलगीकरण कक्षांना भेटी देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करुन दाखल रुग्ण, नागरिक, दक्षता समिती सदस्य, ग्रामस्थांशी व्यवस्थेबद्दल चर्चा केली. त्यांच्या सोबत प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत होते.

स्थानिक डॉक्टर्स आणि आशा वर्कर्स यांच्या मार्फत उत्तम वैद्यकीय सेवा, निवास भोजनाची दर्जेदार व्यवस्था, आपुलकीची वागणूक आणि व्यायाम व मनोरंजनासाठी विविध साधने उपलब्ध असल्याने आजाराची भिती राहिली नसल्याचे सांगत निंबळक प्राथमिक शाळेतील रुग्णांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांना येथील संपूर्ण व्यवस्था उत्तम असल्याचे सांगितले.

निंबळक येथील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात असून प्रशासन सर्वोपरी परिस्थितीवर लक्ष देत असल्याचे तसेच ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले.

उद्योजक राम निंबाळकर यांनी कोरोना काळात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधा, राबविलेले विविध उपक्रम याविषयी माहिती देऊन निंबळक कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वस्तरावरुन सुरु असलेल्या प्रयत्नातून निंबळक लवकरच कोरोना मुक्त होईल याची ग्वाही दिली.

जिल्हा पोलिस प्रमुखांच्या भेटीवेळी महसूल मंडलाधिकारी जाधव, ग्रामविकास अधिकारी शिंदे, पोलीस पाटील समाधान कळसकर, मठाचीवाडीचे पोलीस पाटील पंकज भोसले, सरपंच राजेंद्र मदने, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान सजाई गार्डन कोरोना केअर सेंटर व तरडगाव येथील विलगीकरण कक्ष आणि एकूणच फलटण शहर व तालुक्यातील कोरोना नियंत्रण उपाय योजना, लॉक डाऊन, रुग्णांना मिळणार्‍या सुविधा, लसीकरण, टेस्टिंग वगैरे बाबत प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.


Back to top button
Don`t copy text!