दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धांमुळे महिला दिन कृतिशील पद्धतीने साजरा करण्यात आला, या कुस्ती स्पर्धांच्या माध्यमातून महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाल्याचे नमूद करीत महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कुस्ती स्पर्धेतील महिलांना शुभेच्छा दिल्या.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३ महिलांना श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षी पासून सुरु करण्यात आलेला “विजयमाला” महिला पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला, तसेच जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. प्रमुख उपस्थितांमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्या सौ. नूतन अजित शिंदे, सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, पै. संजय मदने, किशोरसिंह नाईक निंबाळकर, महादेव माने, भाऊ कापसे यांचा समावेश होता.
कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका एन आय एस कोच अनिता गव्हाणे या प्रशिक्षणाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने करत असल्याबद्दल त्यांचा गौरव करताना, आजही महिलांना समान संधी मिळत नसल्याची खंत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानाचा दिवस असून त्यांना समान संधी देणे, त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करणे याबरोबर त्यातून इतर महिलांना प्रोत्साहन मिळावे हा महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांनी स्पष्ट केले.
स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल अड. सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले, अपंगत्वावर मात करीत स्वतःबरोबर सामान्य महिलांचे आर्थिक साक्षरते बाबत केलेल्या कार्याबद्दल छाया दगडू बोबडे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल सौ. शालन येळे यांना माजी नगराध्यक्षा सौ. नीताताई मिलिंद नेवसे यांच्या हस्ते विजयमाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते.
श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रामार्फत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वयोगट व वजनगटातील १०० पेक्षा अधिक मुलींनी सहभाग नोंदविला. प्रत्येक वजन गटातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त मुलींना रोख बक्षीस, प्रमाणपत्र, ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.
१४ वर्षे वयोगटात ३० किलो वजन गटात वैष्णवी ढेकळे फलटण प्रथम, स्नेहा ढेकळे वाखरी द्वितीय, ३६ किलो वजन गटात अमृता ढेकळे वाखरी प्रथम, समर्था गोफणे सोमंथळी द्वितीय, ४२ किलो वजन गटात अंजली वेताळ कराड प्रथम, वेदिका शेंडगे द्वितीय, १७ वर्ष वयोगटात ४३ किलो वजन गटात शिवानी करचे फलटण प्रथम, पूजा ढेकळे द्वितीय, ४० किलो वजन गटात अनुष्का यादव सोमंथळी प्रथम, सलोनी ढेकळे द्वितीय, ४९ किलो वजन गटात अमृता चौगुले प्रथम, मुल्ला जनाब द्वितीय, २९ वर्षे वयोगटात किरण गायकवाड साखरवाडी प्रथम, ऋतुजा पवार फलटण द्वितीय, ५५ किलो वजन गटात आर्या पवार कराड प्रथम, श्रुती गोफणे फलटण द्वितीय, ५९ किलो वजन गटात रोशनी बोडके सोमंथळी प्रथम, अमृता चौगुले कराड द्वितीय.
या महिला कुस्ती स्पर्धेमध्ये अमोल साठे एन आय एस कुस्ती कोच कराड, रमेश थोरात सातारा, पूजा भोसले फलटण, वसंत गायकवाड बारामती यांनी पंच म्हणून काम केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राची माहिती देऊन महिलांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेतला. प्रा. नीलम देशमुख यांनी सूत्रसंचालन यांनी, समारोप व आभार प्रदर्शन प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापिका, महिला तसेच स्पर्धकांचे पालक आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.