दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । सातारा । बेटी बचाओ- बेटी पढाओ अंतर्गतची जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) दीपक ढेपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागातील गरोदर मातांची अंगणवाडीमध्ये शंभर टक्के नोंद करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, खासगी हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांचीही नोंद झाली पाहिजे. यासाठी खासगी हॉस्पिटलांना पत्र देण्यात यावे. ग्रामीण भागातील व जे कुटुंब अत्यंत गरीब आहेत अशा कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन शिक्षणातील त्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम व जनजागृती करावी.
यावेळी पोषण अभियान जिल्हास्तरीय अभिसरण आराखडा व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये अंगणवाडी केंद्र इमारतींचे बळकटीकरण, पूरक पोषण आहाराच्या गुणवत्तेची खात्री, प्रभावी आरोग्य सेवा या विषयी चर्चा करण्यात आली.